Municipal Corporation like pattern in ZP Panchayat samiti : झेडपी-पंचायत समितीत महापालिकेसारखा पॅटर्न
Mumbai : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अंतिम दिवस होता. त्यामुळे 15 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांमधील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून आता प्रत्यक्ष प्रचाराला वेग येणार आहे. मात्र प्रचार सुरू होण्यापूर्वीच महायुतीने कोकणात मोठा राजकीय धक्का दिला असून तब्बल 22 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांतही महापालिकेच्या धर्तीवरचा राजकीय पॅटर्न दिसू लागल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
कोकण विभागात विशेषतः तळकोकणात महायुतीने सुरुवातीलाच विजयाचे खाते उघडले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपचे 19 तर शिंदे गटाच्या शिवसेनेचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्हा परिषद स्तरावर खारेपाटण येथून प्राची इस्वालकर, बांदा येथून प्रमोद कामत, पडेल येथून सुयोगी घाडी, बापर्डे येथून अवनी तेली, कोळपे येथून प्रमोद रावराणे आणि किंजवडे येथून सावी लोके या भाजपच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर जाणवली जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे गटाच्या शिवसेनेच्या रुहिता तांबे या उमेदवारही बिनविरोध विजयी ठरल्या आहेत.
Republic Day : गिरीश महाजन यांच्या विरोधात मेहकर वकील संघ आक्रमक!
पंचायत समिती स्तरावरही महायुतीचे वर्चस्व ठळकपणे दिसून आले आहे. बिडवाडी येथून संजना राणे, वरवडे येथून सोनू सावंत, कोकीसरे येथून साधना नकाशे, पडेल येथून अंकुश ठूकरूल, नाडण येथून गणेश राणे, बापर्डे येथून संजना लाड, नाटळ येथून सायली कृपाळ, नांदगाव येथून हर्षदा वाळके, शिरगाव येथून शीतल तावडे, फणसगाव येथून समृद्धी चव्हाण, जाणवली येथून महेश्वरी चव्हाण, आडवली-मालडी येथून सीमा परुळेकर आणि आसोली येथून संकेत धुरी हे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय दोडामार्ग तालुक्यातील कोलझर पंचायत समिती मतदारसंघातून शिंदे गटाच्या शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस बिनविरोध निवडून आले आहेत. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार प्रवीण परब यांनी अर्ज मागे घेतल्याने हा मार्ग मोकळा झाला. गणेशप्रसाद गवस हे शिंदे गटाचे दोडामार्ग तालुकाप्रमुख असून त्यांच्या बिनविरोध निवडीने महायुतीचा उत्साह वाढला आहे.
रायगड जिल्ह्यातही महायुतीसाठी सकारात्मक संकेत मिळाले आहेत. महाड पंचायत समितीतील सवाने-धामणे गणातून उभे असलेले शिंदे गटाचे उमेदवार अनिल जाधव यांच्या विरोधातील उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे रायगडमध्ये शिंदे शिवसेनेला पहिला बिनविरोध विजय मिळाला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी शिवसैनिकांना पेढे भरवत आनंद साजरा केला.
मतदान होण्याआधीच मिळालेल्या या बिनविरोध विजयांमुळे महायुतीने कोकणात आपली राजकीय पकड अधिक मजबूत केल्याचे चित्र असून आगामी निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
___








