Malegaon Municipal Corporation : मालेगाव महापालिकेत प्रस्थापित पक्षांना धक्का; ‘सेक्युलर फ्रंट’चा महापौर बसणार

Secular-front-to-appoint-mayor : इस्लाम आणि समाजवादी पक्षाची युती यशस्वी; काँग्रेसच्या पाठिंब्याने बहुमताचा आकडा पार

Malegao राज्यातील बड्या राजकीय पक्षांना आणि युतीला अनपेक्षित धक्का देत मालेगाव महापालिकेत ‘इस्लाम–समाजवादी पार्टी सेक्युलर फ्रंट’ने सत्ता स्थापनेच्या हालचाली पूर्ण केल्या आहेत. महापालिकेत बहुमतासाठी आवश्यक असलेला ४३ हा आकडा या फ्रंटने सहज गाठला असून, महापौर आणि उपमहापौर पदासाठी आपल्या उमेदवारांची घोषणाही केली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे सेक्युलर फ्रंटचे संख्याबळ अधिक भक्कम झाले असून, यामुळे फ्रंटचा महापौर बसण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

फ्रंटतर्फे महापौरपदासाठी नसरीनबानो शेख खालीद हाजी यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून, सोमवारी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. नसरीनबानो या बारावीपर्यंत शिक्षित असून त्यांचे मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व आहे. तर, उपमहापौरपदासाठी समाजवादी पक्षाच्या शानेहिंद निहाल अहमद यांची निवड करण्यात आली आहे. शानेहिंद या एलएलबी आणि एमसीए पदवीधारक असून त्या तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेत्या म्हणूनही काम पाहिले असल्याने त्यांना सभागृहातील कामकाजाचा दांडगा अनुभव आहे.

Akola Municipal Corporation : महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदासाठी रस्सीखेच

मालेगावचे राजकीय समीकरण यावेळी अत्यंत गुंतागुंतीचे बनले आहे. एकीकडे काँग्रेस आणि भाजपच्या काही नगरसेवकांनी एकत्र येत ‘भारतीय विकास आघाडी’ नावाचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला भाजपचे अधिकृत नगरसेवक या निवडणुकीत तटस्थ राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धार्मिक पक्षाला मतदान केल्याची टीका टाळण्यासाठी भाजप मतदान प्रक्रियेपासून लांब राहू शकते, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

Amravati Municipal Corporation : अमरावती महापौरपदासाठी नागपुरात खलबते

सेक्युलर फ्रंटने मिळवलेले हे यश मालेगावच्या स्थानिक राजकारणात मोठे फेरबदल घडवून आणणारे ठरणार आहे. प्रस्थापित पक्षांना बाजूला सारत एका नव्या आघाडीने सत्ता काबीज केल्यामुळे आगामी काळात मालेगावचा विकास आणि प्रशासकीय कामकाज कसे राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौर निवडीच्या दिवशी होणाऱ्या अधिकृत प्रक्रियेनंतर मालेगाव महापालिकेच्या नव्या पर्वाला सुरुवात होईल.