Amravati Municipal Corporation : अमरावतीत महायुतीचं ठरलं! चारही पक्षांना मिळणार संधी

Bjp-Yuva-Swabhiman-alliance-formula-for-Amravati-municipal-corporation-mayor-election : महापौरपदासाठी सव्वा वर्षांचा फॉर्म्युला; भाजप व युवा स्वाभिमानकडून उमेदवार जाहीर

Amravati अमरावती महापालिकेत भाजप, युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिंदेसेना यांची महायुती करून सत्ता स्थापन करण्यावर एकमत झाले आहे. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार पहिल्या टप्प्यात भाजपचे श्रीचंद तेजवानी तर दुसऱ्या टप्प्यात आशिष अतकरे हे सव्वा–सव्वा वर्षांसाठी महापौरपदाची धुरा सांभाळणार आहेत.

त्याचप्रमाणे, युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे आणि अजय जयस्वाल हे सव्वा–सव्वा वर्षांसाठी उपमहापौरपदाचा कारभार पाहणार आहेत. याबाबत भाजप व युवा स्वाभिमान पक्षात अधिकृत राजकीय करार झाला आहे. महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक ६ फेब्रुवारी रोजी होणार असून, सोमवारी श्रीचंद तेजवानी आणि सचिन भेंडे यांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

Ajit Pawar death : जिजाऊ जन्मस्थानापासून अजितदादांच्या अस्थिकलशाचा दर्शन प्रवास

अमरावती महापालिकेच्या २२ प्रभागांतून एकूण ८७ नगरसेवक निवडून आले असून, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून सत्ता स्थापन करण्याची वेळ आली आहे. भाजपने २५ जागांवर विजय मिळवून सर्वांत मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. मात्र सत्ता स्थापनेसाठी भाजपला मित्रपक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पक्ष, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची मदत घ्यावी लागत आहे.

सध्याच्या गणितानुसार भाजपचे २५, युवा स्वाभिमान पक्षाचे १५, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ११ आणि शिंदेसेनेचे ३ असे एकूण ५४ नगरसेवकांचे संख्याबळ महायुतीकडे आहे. हे संख्याबळ महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी पुरेसे ठरणार आहे. मात्र उपमहापौरपदासाठी युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नगरसेवक मतदानावेळी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune land scam : पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपपत्र दाखल

भाजपकडून महापौरपदाचे उमेदवार ठरविताना नगरसेवकांची मते जाणून घेण्यात आली. कोअर कमिटीने जिल्हा स्टेडियम प्रभागातील श्रीचंद तेजवानी आणि गडगडेश्वर प्रभागातील आशिष अतकरे यांच्या नावांवर सव्वा–सव्वा वर्षांसाठी महापौरपदाचा फॉर्म्युला मांडला.