Sharad-Pawar-slams-Devendra-Fadnavis-over-ncp-merger-talks : अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून वाद पेटला; फडणवीसांच्या दाव्यावर पवारांचा प्रहार
Baramati उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आली आहे. या पार्श्वभूमीवर आज, ४ फेब्रुवारी रोजी बारामती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. “विलीनीकरणाच्या चर्चेत फडणवीस कुठेच नव्हते, मग त्यांना माझ्याबद्दल बोलण्याचा अधिकार कोणी दिला?” असा परखड सवाल पवारांनी उपस्थित केला आहे.
अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी दावा केला होता की, “अजित पवार यांची शरद पवारांशी सविस्तर चर्चा झाली होती आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची अधिकृत घोषणा लवकरच होणार होती.” मात्र, मुख्यमंत्र्यांनी हा दावा खोडून काढत म्हटले होते की, “अशी कोणतीही चर्चा अजित पवारांनी आमच्याशी केली नव्हती. चर्चा झाली असती तर आम्हाला कल्पना असती.” मुख्यमंत्र्यांच्या याच विधानावर आता शरद पवारांनी जोरदार पलटवार केला आहे.
BMC Mayor Election : मुंबईच्या महापौरपदी राहुल नार्वेकरांच्या नातेवाईक? भाजपमध्ये धुसफूस!
शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “विलीनीकरणाच्या प्रक्रियेत फडणवीस कुठेही सहभागी नव्हते. त्यामुळे त्यांना माझ्याबाबत किंवा आमच्या अंतर्गत चर्चेबाबत भाष्य करण्याचा काय अधिकार आहे, हेच मला समजत नाही,” अशा शब्दांत पवारांनी त्यांना सुनावले. सध्या आम्ही अजितदादांच्या जाण्याने आलेल्या संकटातून सावरण्याचा आणि एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहोत. राजकीय निर्णयांवर आम्ही बाहेरच्या लोकांशी चर्चा करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विलीनीकरणाच्या वादातही शरद पवारांनी आपली कौटुंबिक आणि राजकीय समतोल राखणारी भूमिका मांडली. सुनेत्रा पवार यांचा नुकताच शपथविधी झाला, त्याबाबत विचारले असता, “त्यांना संधी मिळाली याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे,” असे म्हणत त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
https://sattavedh.com/mayoral-election-mahayuti-wins-mayor-elections-in-thane-kalyan-and-ulhasnagar-unoppose
अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही गट एकत्र येणार अशी शक्यता वर्तवली जात असतानाच, प्रफुल्ल पटेल आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी विलीनीकरणाची चर्चा फेटाळून लावली आहे. यामुळे दोन्ही गटातील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे आहेत. शरद पवारांनी आज घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे ‘मविआ’ आणि ‘महायुती’ मधील राजकीय कलगीतुरा आगामी काळात अधिक टोकदार होण्याची शक्यता आहे.








