Eleven municipal councils in the district face a financial crunch : ‘प्रशासकराज’ संपल्यानंतर मार्चअखेर निधी मिळण्याची आशा
Buldhana गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नगरपरिषदांवर प्रशासकीय कारभार सुरू असल्याने केंद्र सरकारकडून मिळणारा वित्त आयोगाचा निधी जिल्ह्यातील नगरपरिषदांना प्राप्त झाला नाही. परिणामी विकासकामे, नागरी सुविधा आणि प्रशासकीय खर्चांवर विपरीत परिणाम झाला असून ११ नगरपरिषदा आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. आता सर्व नगरपरिषदांवर लोकनियुक्त प्रतिनिधींची निवड झाल्याने वित्त आयोगाच्या निधीचे हप्ते मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मार्च अखेरपर्यंत सुमारे ४४ ते ४७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नगरपरिषदांच्या निवडणुका रखडल्यामुळे गेल्या काही वर्षांत प्रशासकांकडून कारभार चालविला जात होता. या काळात स्वच्छता व इतर नागरी सेवांसाठीची अनेक कंत्राटे संपुष्टात आली, तर काही ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतनही थकले. वित्त आयोगाच्या निधीतूनच प्रशासकीय कामकाज व नागरी सुविधांसाठी खर्च केला जातो; मात्र लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्याने हा निधी मिळू शकला नाही, असे समोर आले आहे.
Buldhana Zilla Parishad : बुलढाणा जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर; चिखलीतील इच्छुकांचा खर्चावर ‘ब्रेक’
आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी मार्च महिन्याच्या आत निधी पालिकांना वितरित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नगरपरिषदांची आर्थिक घडी पुन्हा बसण्यास मदत होणार आहे. तसेच नव्याने निवडून आलेले नगराध्यक्ष शासनस्तरावरून अतिरिक्त विकासनिधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संकेत आहेत.
पुढील महिन्यात नगरपरिषदांची अंदाजपत्रके सादर होणार आहेत. मागील दोन ते तीन वर्षे प्रशासकांकडूनच अंदाजपत्रके सादर केली जात होती; मात्र आता लोकनियुक्त प्रशासनामुळे विकासकामांसाठीच्या योजनांचा समावेश वाढण्याची शक्यता आहे.
Khamgao Nagar Parishad : अबब! खामगाव नगर परिषदेत ५ कोटींची करवाढ प्रस्तावित
बुलढाणा जिल्ह्यात सात ‘ब’ वर्ग व चार ‘क’ वर्ग अशा एकूण ११ नगरपरिषदा असून नागरी लोकसंख्या सुमारे साडेसहा लाख आहे. ‘ब’ वर्ग नगरपालिकांना सरासरी पाच कोटी तर ‘क’ वर्ग नगरपालिकांना सुमारे तीन कोटी रुपयांचे अनुदान अपेक्षित धरल्यास जिल्ह्यातील सर्व पालिकांना मिळून जवळपास ४७ कोटी रुपयांचा निधी मिळू शकतो. खामगाव व बुलढाणा नगरपरिषदांना लोकसंख्येनुसार अधिक निधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.








