
bjp-internal-conflict-standing-committee-chairman-post-delayed-shivani-dani : ज्येष्ठांना डावलून ‘नव्या’ चेहऱ्याला संधी देण्यावरून कलह; अंतर्गत बंडाच्या भीतीने सभा गुंडाळली
Nagpur नागपूर महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर आता खऱ्या सत्तेचे केंद्र असलेल्या ‘स्थायी समिती’च्या सभापती पदावरून भाजपमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र आहे. तिजोरीच्या चाव्या कोणाकडे द्यायच्या, यावरून ज्येष्ठ आणि नवख्या नगरसेवकांमध्ये जुंपली असून, अंतर्गत लाथाळी चव्हाट्यावर येऊ नये म्हणून प्रशासनाने चक्क सभाच अनिश्चित काळासाठी तहकूब केली. “कुछ तो गडबड है दया”, अशा चर्चांनी आता महापालिकेच्या गोटात उधाण आले आहे.
सुरुवातीला महापौर पदासाठी चर्चेत असलेल्या शिवानी दाणी यांना आता स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, या निर्णयाला भाजपच्या जुन्या फळीतील नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “आम्ही तीन-तीन वेळा निवडून आलो, तरीही प्रथमच सभागृहात आलेल्यांना महत्त्वाची पदे मिळणार असतील, तर आमच्या निष्ठेचे काय?” असा संतप्त सवाल ज्येष्ठ नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. या वादामुळेच १६ सदस्यांच्या नावांची अधिकृत घोषणा ऐनवेळी रोखावी लागली.
गेल्या २० वर्षांपासून उपेक्षित असलेल्या दक्षिण नागपूरला नीता ठाकरे यांच्या रूपाने महापौरपद तर मिळाले, मात्र स्थायी समितीवर कोणाचे वर्चस्व राहणार, यावर कळीचा मुद्दा अडकला आहे. मागील टर्ममध्ये दक्षिण-पश्चिम नागपूरला (नंदा जिचकार, संदीप जोशी, प्रकाश भोयर) झुकते माप मिळाल्याने इतर आमदारांनी आता आपल्या कार्यकर्त्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपच्या गट नोंदणी वेळी अनेक नगरसेवक नाराज होते. त्यांना मनधरणी करून विभागीय आयुक्तालयात नेण्यासाठी नेत्यांची दमछाक झाली, हेच या असंतोषाचे मूळ मानले जात आहे.
स्थायी समितीत भाजपच्या वाट्याला १३ तर काँग्रेसच्या वाट्याला ३ जागा येणार आहेत. भाजपला आपल्या १३ निष्ठावंतांची नावे देताना प्रादेशिक आणि जातीय समीकरणांसोबतच ‘ज्येष्ठता’ जपण्याचे मोठे आव्हान आहे. आता या प्रकरणाचा ‘निकाला’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला असून, भाजपमधील हे धुसफूस थांबवण्यासाठी कोणाचा बळी दिला जातो, की मध्यमार्ग काढला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








