BJP begins meetings, conventions and outreach tours : शिंदेंच्या हालचालींना वेग; बैठका, मेळावे संपर्क दौरे सुरू
Buldhana बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आता थेट जिल्हा परिषद राजकारणाकडे मोर्चा वळविल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. नगरपालिकेतील पराभवानंतर पक्षातील समीकरणे ढवळून निघाली असतानाच शिंदे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग दिल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुकानिहाय बैठका, कार्यकर्त्यांचे मेळावे आणि संपर्क दौरे सुरू झाले आहेत. पराभवानंतर काही काळ शांत राहिलेले शिंदे पुन्हा सक्रिय झाल्याने भाजपच्या अंतर्गत राजकारणालाही उधाण आल्याची चर्चा आहे.
काही राजकीय जाणकारांच्या मते, नगरपालिका निवडणुकीतील अपयशातून धडा घेत शिंदे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अधिक आक्रमक रणनीती अवलंबतील. तर काहींच्या मते, हा त्यांच्या राजकीय पुनरागमनाचा प्रयत्न आहे. एकूणच, शिंदे यांच्या वेगवान हालचालींमुळे ‘नगरपालिकेत अपयश आले, पण झेडपीत डाव साधणार का?’ हा प्रश्न सध्या जिल्ह्यातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.








