व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay Gaikwad : ‘बाप तो बाप रहेगा’, आमदार संजय गायकवाडांना भोवलं

Sanjay Gaikwad : ‘बाप तो बाप रहेगा’, आमदार संजय गायकवाडांना भोवलं

sanjay-gaikwad-controversial-statement-case-filed-buldhana : महिलेच्या तक्रारीनंतर बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल

Buldhana : भाजपा आमदार श्वेता महाले यांच्यावर टीका करताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता पोलिसांपर्यंत पोहोचले आहेत. महिलांच्या शरीरयष्टीवर आक्षेपार्ह भाष्य केल्याचा आरोप करत एका ४२ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे बुलढाण्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे.

भाजपा आमदार श्वेता महाले यांचे पती आणि मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा शहरात मित्रपरिवाराकडून मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातून वाढदिवसाची रॅलीही काढण्यात आली. या रॅलीदरम्यान ‘बाप तो बाप रहेगा’ अशा आशयाचे गाणे वाजवण्यात आले होते. या गाण्यावरून प्रसारमाध्यमांनी आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया घेतली. त्यावेळी त्यांनी या गाण्याच्या संदर्भातून आमदार श्वेता महाले यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. पुरुषाने स्वतःला ‘बाप’ म्हणणे वेगळे आणि एखाद्या महिलेने तसे म्हणणे वेगळे असल्याचे सांगताना त्यांनी महिलेच्या शरीरयष्टीचा संदर्भ देणारे वक्तव्य केले.

Shivsena politics : शिवसेनेची पुन्हा बांधणी की जुन्याच राजकारणाची पुनरावृत्ती?

आमदार संजय गायकवाड यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय तसेच सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली. महिलांच्या शरीरयष्टीबाबत अशा प्रकारे भाष्य करणे आक्षेपार्ह असल्याचा सूर उमटला. दरम्यान, या वक्तव्यामुळे महिलांच्या सन्मानाला आणि लज्जेला धक्का पोहोचल्याचा आरोप करत बुलढाणा येथील ४२ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. संबंधित वक्तव्य जाणीवपूर्वक आणि महिलांचा अपमान करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीची दखल घेत बुलढाणा शहर पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला अधिकच राजकीय रंग आला आहे. या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई पोलिसांकडून केली जात आहे. या संपूर्ण वादाची सुरुवात वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या राजकीय टोलेबाजीपासून झाली. कार्यक्रमाच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर आमदार श्वेता महाले यांनी आमदार संजय गायकवाड यांचे नाव न घेता त्यांच्यावर टोला लगावल्याचे सांगितले जाते.

Manoj Jarange : मनोज जरांगेंचा मराठा मोर्चा मुंबईत धडकणार!

यानंतर गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना महाले यांच्या भूमिकेवर टीका केली. राज्यात दुष्काळासारखी परिस्थिती असताना वाढदिवसाच्या कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याऐवजी गरजू आणि गरीब नागरिकांना मदत करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. वाढदिवसाच्या रॅलीत वाजवण्यात आलेल्या ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्याचा संदर्भ घेत गायकवाड यांनी महाले यांना प्रत्युत्तर दिले. याचवेळी त्यांनी महिलांच्या शरीरयष्टीशी संबंधित केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले.

राजकारणात आपल्याला कोणी आव्हान देत असेल, तर त्याला योग्य वेळी उत्तर दिले जाईल आणि राजकारणातील ‘बाप’ कोण आहे, हे दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला होता. आता पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने या राजकीय शाब्दिक संघर्षाला कायदेशीर वळण मिळाले आहे. आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधातील तक्रारीनंतर बुलढाणा शहर पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!