social media india : Deepfake आणि AI कंटेंटवर सरकारची कडक कारवाई

deepfake-ai-content-new-it-rules-social-media-india : सोशल मीडियासाठी नवीन आयटी नियम अधिसूचित

New Delhi : Deepfake आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तयार होणाऱ्या बनावट कंटेंटवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून माहिती तंत्रज्ञान नियम 2021 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करत नवीन नियम अधिसूचित केले आहेत. या नव्या नियमांमुळे सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी जबाबदाऱ्या अधिक कडक करण्यात आल्या असून हे नियम 20 फेब्रुवारी 2026 पासून लागू होणार आहेत.

नवीन नियमांनुसार सरकार किंवा न्यायालयाकडून आदेश मिळाल्यानंतर Deepfake किंवा AI-आधारित बेकायदेशीर कंटेंट केवळ तीन तासांच्या आत हटवणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. याआधी ही कालमर्यादा 36 तासांची होती. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X, Instagramसह इतर डिजिटल इंटरमीडियरीजना आता तातडीने कारवाई करावी लागणार असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

Census 2026 : जनगणनेच्या ३३ प्रश्नांत ‘ओबीसी’ गायब! राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा संताप; केंद्र सरकारविरोधात एल्गार

या सुधारणांमुळे वापरकर्त्यांच्या तक्रार निवारणासाठी दिली जाणारी वेळही लक्षणीयरीत्या कमी करण्यात आली आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मनी यूजर्सकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची जलद आणि प्रभावी दखल घ्यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. Deepfake आणि बनावट AI कंटेंटमुळे समाजात गैरसमज, फसवणूक आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही पावले उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिसूचनेनुसार AI-वरून तयार करण्यात आलेल्या कंटेंटसाठी लेबलिंग अनिवार्य करण्यात आले आहे. बनावट किंवा कृत्रिमरित्या निर्मित कंटेंट तयार करणाऱ्या अथवा तो शेअर करण्याची सुविधा देणाऱ्या प्लॅटफॉर्मनी स्पष्ट आणि ठळक स्वरूपात AI लेबल लावणे आवश्यक असेल. तांत्रिकदृष्ट्या शक्य असेल तिथे स्थायी मेटाडेटासह हे लेबल जोडण्याची अट घालण्यात आली आहे. एकदा AI लेबल लावल्यानंतर ते लपवणे किंवा हटवणे प्लॅटफॉर्मना परवानगी दिली जाणार नाही, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

मात्र या नियमांमधून काही बाबी वगळण्यात आल्या आहेत. सामान्य संपादन, दर्जा सुधारण्यासाठी केलेले बदल तसेच चांगल्या हेतूने वापरले जाणारे शैक्षणिक, संशोधन आणि डिझाइनशी संबंधित AI वापर या नियमांच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, भारताच्या AI क्षेत्रातही महत्त्वाची घडामोड समोर आली असून भारतीय AI स्टार्टअप सर्वम एआयने ‘सर्वम व्हिजन’ नावाचे प्रगत मल्टिमॉडल AI मॉडेल लाँच केले आहे. हे मॉडेल दस्तऐवज बुद्धिमत्ता, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन आणि भारतातील विविध भाषा व लिपी समजून घेण्यासाठी सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. सर्वम एआयनुसार हे मॉडेल जेमिनी 3 प्रो, GPT-5.2 यांसह आघाडीच्या आंतरराष्ट्रीय AI मॉडेल्सपेक्षा सरस ठरत आहे.

Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूरच्या आखाड्यात मुनगंटीवारांचा ‘मुरब्बी’ डाव!

भारतातील ऐतिहासिक शिलालेख, ताडपत्रे, जुने ग्रंथ आणि अभिलेखांमध्ये दडलेले ज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जगासमोर आणण्याची क्षमता या AI मॉडेलमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे सरकार AI आणि Deepfake कंटेंटवर नियंत्रण आणत असताना, दुसरीकडे देशांतर्गत AI संशोधनाला चालना देण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचे या घडामोडींमधून स्पष्ट होत आहे.