Chandrapur Municipal Corporation : भाजपची मोहीम यशस्वी, पण वंचितच्या जिल्हाध्यक्षाचा गेला बळी

chandrapur-mayor-election-bjp-victory-vba-district-president-dismissed : चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय नाट्याचे उमटताहेत पडसाद

Chandrapur चंद्रपूर महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव झाला असून भाजपच्या संगीता खांडेकर महापौर झाल्या आहेत. सर्वाधिक नगरसेवक आणि बहुमताच्या जवळ पोहोचल्यानंतरही काँग्रेसला या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. हे सर्व वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमुळे घडले आहे. वंचितचे दोन्ही नगरसेवक मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहिले. ही अनुपस्थिती अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणारी ठरल्याने, वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर वंचितचे जिल्हाध्यक्ष स्नेहल रामटेके यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, जिल्हा कार्यकारिणीदेखील स्थगित करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर महापालिकेत वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत गटनोंदणी केली होती. एकूण आठ नगरसेवकांच्या बळावर ठाकरे गटाने महापौरपदावर दावा केला होता. त्यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडे महापौरपदाचा प्रस्ताव ठेवला होता.

Chandrapur pattern in Parbhani : परभणीत ‘चंद्रपूर पॅटर्न’ची धास्ती; फूट रोखण्यासाठी काँग्रेस-उद्धवसेनेचे नगरसेवक सहलीवर!

राज्यात महाविकास आघाडीचे समीकरण असल्याने ठाकरे गट भाजपकडे जाणार नाही, असा विश्वास काँग्रेस नेतृत्वाला होता. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी भाजप वगळता कोणाशीही आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले होते.

महापौरपदाच्या निवडणुकीच्या एक तास आधीपर्यंत दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये वाटाघाटी सुरू होत्या. मात्र, काँग्रेसने महापौरपद देण्यास स्पष्ट नकार दिला. दुसरीकडे, भाजपने सव्वा वर्षानंतर महापौरपद, दोन वेळा स्थायी समिती सभापतिपद आणि पाच वर्षे उपमहापौरपद देण्याचे मान्य केले.

काँग्रेसच्या तुलनेत भाजपसोबतच्या वाटाघाटी अधिक फायदेशीर ठरल्याने वंचितने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला. मतदानापूर्वी अवघ्या एक तास आधी या वाटाघाटींवर शिक्कामोर्तब झाले. असे असूनही भाजपला पराभवाची धास्ती होतीच. त्यातच ‘वंचित’च्या नगरसेवकांनी ऐनवेळी मतदानाला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. ही सर्व खेळी आणि मताधिक्यासाठी लागणारी आकडेमोड भाजपच्या धुरिणांनी यशस्वीपणे राबवल्याचे समोर आले आहे.

social media india : Deepfake आणि AI कंटेंटवर सरकारची कडक कारवाई

एमआयएमचा एक नगरसेवक तटस्थ राहिल्याने भाजपचा मार्ग अधिक सुकर झाला. भाजपची ही मोहीम यशस्वी ठरली असली तरी, यात वंचितच्या जिल्हाध्यक्षांना आपले पद गमवावे लागले आहे. वंचित बहुजन आघाडीचे महासचिव किसन चव्हाण यांनी जिल्हाध्यक्षांच्या हकालपट्टीचे आदेश जारी केले आहेत.