व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण ‘कोण निवृत्त होणार हे जनता ठरवेल’, शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे...

‘कोण निवृत्त होणार हे जनता ठरवेल’, शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे संतापल्या

संजय राऊतांनीही चर्चांना दिले उत्तर, एनडीए प्रवेशाच्या चर्चांवरही स्पष्टीकरण

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए मध्ये सहभागी होणार असल्याचीही चर्चा सुरू असल्याने या विषयावर राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी या चर्चांवर तीव्र नाराजी व्यक्त करत शरद पवार निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही शरद पवार हे इंडिया आघाडीसोबतच राहतील, असे सांगत या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांची प्रकृती अलीकडे बिघडल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या शक्यतेबाबत काही माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार निवृत्त होणार नाहीत. कोण निवृत्त होणार, हे जनता ठरवेल. शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ अद्याप पाच वर्षांचा असल्याने त्यांच्या निवृत्तीच्या बातम्या कशाच्या आधारावर दिल्या जात आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होणे संतापजनक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा केल्याचे विधान केले होते. मात्र, सुप्रिया सुळे यांनी या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली. अजित पवार हयात असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा झाली होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर आमच्या बाजूने हा विषय संपला आहे. पक्षातील नेतेही आता यावर भाष्य करत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

रोहित पवार स्वतःला राष्ट्रीय नेते समजू लागले आहेत, सुप्रिया सुळेंना खटकतंय; परिणय फुके यांचा दावा

दरम्यान, शरद पवार यांच्या संभाव्य निवृत्तीबरोबरच त्यांचा पक्ष एनडीए मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांवर संजय राऊत यांनीही भूमिका स्पष्ट केली. शरद पवार कुठेही जाणार नाहीत. ते इंडिया आघाडीत आहेत आणि इंडिया आघाडीसोबतच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवार फुले, शाहू आणि आंबेडकर यांचे विचार सोडणार नाहीत, असेही राऊत म्हणाले.

शरद पवार यांचे संपूर्ण राजकीय आयुष्य धर्मांध शक्तींविरोधात लढण्यात गेले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार पुढे नेण्याचे काम पवार यांनी केले, असे सांगत त्यांच्या कुटुंबातील आणि पक्षातील नेत्यांनी या वैचारिक भूमिकेचे भान ठेवले पाहिजे, असे आवाहनही राऊत यांनी केले. सत्तेत जाण्याच्या घाईत काही जणांकडून वैचारिक भूमिका बाजूला ठेवली जात असेल, तर त्यामुळे पवारांच्या राजकीय विचारप्रवाहाला धक्का बसेल, अशी टिप्पणी त्यांनी केली.

निवडणुकांची वाट न पाहता दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याच्या विधानावरही संजय राऊत यांनी टीका केली. भाजपनेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून शरद पवार यांना राजकीयदृष्ट्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. अडचणीच्या काळात शरद पवार यांनी भाजपला मदत आणि संरक्षण दिले; मात्र त्याच पक्षाने त्यांचा पक्ष फोडला, अशी टीका राऊत यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांना पाठिंबा दिला होता, तरीही भाजपने शिवसेनेत फूट पाडली, असे सांगत त्यांनी भाजपच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित केले.

एकीकडे सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत विरोध केला आहे, तर दुसरीकडे संजय राऊत यांनी त्यांच्या इंडिया आघाडीतील भूमिकेवर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राजकीय भवितव्याबाबत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

____

 

error: Content is protected !!