harshvardhan-sapkal-apologizes-to-shivpremi-slams-bjp-politics : छत्रपती शिवाजी महाराज माझे दैवत, भाजपचा अपप्रचार दंगली घडवण्यासाठीच; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका
Nagpur भाजपने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला आणि सोशल मीडियावर दिशाभूल करणारी मोहीम चालवली. मी जे बोललोच नाही, ते माझ्या तोंडी घालून छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण करण्यात आला, असा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
सपकाळ म्हणाले की, भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी नियोजनपूर्वक अपप्रचार करून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा व दंगली घडवण्याचा प्रयत्न केला. या गलिच्छ राजकारणामुळे काही शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक खेद व्यक्त केला. “छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आणि स्वाभिमान आहेत, त्यांच्याशी कोणाचीही तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपने मला धमक्या दिल्या, पण मी त्यांना घाबरत नाही. अंगावर आले तर शिंगावर घेऊ,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
प्रदेशाध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल सपकाळ यांनी आपल्या कामाचा अहवाल सादर केला. आगामी वर्ष हे ‘संघटन बांधणीचे वर्ष’ म्हणून राबवले जाणार असून, ग्रामीण भागात मंडल स्तरावर आणि शहरात वॉर्ड स्तरावर अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या जातील. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महिला सुरक्षा या मुद्द्यांवरून सरकारला जाब विचारण्यासाठी तीव्र आंदोलने छेडली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. दररोज १० रेल्वे प्रवाशांचा मृत्यू होत आहे आणि ८ शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे प्रश्न घेऊन काँग्रेसने रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन त्यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत केले.
यावेळी बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, यशपाल भिंगे, अतुल लोंढे आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जनतेने कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन करत सपकाळ यांनी या वादावर पडदा टाकण्याची विनंती केली आहे.








