nagpur-fraud-case-nitin-gadkari-pa-fake-identity : नोकरी आणि भूखंडाच्या आमिषाने पती-पत्नीने नातेवाईकालाच लुटले
Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आरोग्य मंत्र्यांच्या पीएसोबत ओळख असल्याचे सांगून शासकीय नोकरी तसेच भूखंड मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीला ७ लाख १ हजार रुपयांनी फसवल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेल्या पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
या प्रकरणातील आरोपींची नावे चंदू किसन खोब्रागडे (५०) आणि सुचिता चंदू खोब्रागडे (४५, रा. ब्रह्मपुरी, चंद्रपूर) अशी आहेत. तक्रारदार युवराज गंगाराम मेश्राम (६०, रा. आनंदनगर) हे प्रॉपर्टी डिलिंगचे काम करतात. चंदू खोब्रागडे हा मेश्राम यांचा दूरचा भाचा असून, २०१३ मध्ये एका अंत्यसंस्काराच्या दरम्यान त्यांची ओळख झाली होती.
Sajid Khan Pathan : ‘बिष्णोई गँग’च्या टार्गेटवर राजकीय पुढारी, आणखी एका आमदाराला धमकीचा फोन
२०१५ मध्ये आरोपी चंदूने मेश्राम यांची भेट घेऊन मंत्रालयातील बड्या नेत्यांशी आणि विशेषतः नितीन गडकरी यांच्या पीएसोबत आपले जवळचे संबंध असल्याचे भासवले. या ओळखीचा वापर करून अनेकांना नोकऱ्या लावल्याचा बनावही त्याने रचला.
मेश्राम यांनी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी चंदूवर विश्वास टाकला आणि त्याला आरोग्य विभागात नोकरी तसेच परिसरात भूखंड मिळवून देण्याची विनंती केली. या कामासाठी आरोपीने वेळोवेळी पैशांची मागणी केली.
Acb trap : मोठी कारवाई! परळीतील तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!
एप्रिल २०१५ ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत मेश्राम यांनी रोख आणि धनादेशाद्वारे एकूण ७ लाख १ हजार रुपये आरोपीला दिले. मात्र, बराच काळ लोटल्यानंतरही नोकरी किंवा भूखंड मिळाला नाही. जेव्हा मेश्राम यांनी आपले पैसे परत मागितले, तेव्हा आरोपी पती-पत्नीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मेश्राम यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, आर्थिक व्यवहारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.








