Raj thackeray : मराठी रंगभूमीवर ‘हाऊसफुल’चा बोर्ड कायम झळकत राहू दे!

raj-thackeray-on-marathi-theatre-sukh-pahata-vasant-kanetkar-housefull-board-message :‘सुख पाहता’च्या आठवणींना उजाळा देत राज ठाकरे यांची सदिच्छा

Mumbai : मराठी रंगभूमीवरील सुवर्णकाळाच्या आठवणींना उजाळा देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘सुख पाहता’ या गाजलेल्या नाटकाच्या निमित्ताने एक भावनिक पोस्ट केली आहे. मराठी नाटकांना ‘हाऊसफुल’चे फलक लागायचे तो काळ पुन्हा यावा आणि नाट्यानुभवासोबतच नाटकांची पुस्तके झपाटून वाचली जावीत, अशी मनापासूनची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, काही दिवसांपूर्वी लायब्ररीत पुस्तक शोधताना ‘सुख पाहता’ या नाटकाचे जुने पुस्तक हाती लागले आणि त्यातून अनेक आठवणी जाग्या झाल्या. ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांचे हे नाटक असून, त्यांच्या नावावर मराठी रंगभूमीवर अनेकदा ‘हाऊसफुल’चे फलक झळकायचे, असे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे या नाटकाच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ स्वतः आपण तयार केले होते, ही आठवण त्यांनी सांगितली.

Devendra fadnavis : अजित पवारांच्या विमान अपघातावर मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा खुलासा!

१९८९ साली ज्येष्ठ नाट्यनिर्माते मोहन वाघ यांनी ‘सुख पाहता’ नाटकाचे पुस्तक प्रकाशित करण्याची कल्पना मांडली होती. त्यावेळी वसंत कानेटकर यांची इच्छा होती की पुस्तकाचे मुखपृष्ठ राज ठाकरे यांनी करावे. त्या काळात नाटकांसोबत त्यांची पुस्तकेही प्रकाशित होत आणि रसिक ती आवडीने विकत घेऊन वाचत असत, अशी नोंद राज ठाकरे यांनी केली.

नाटक पाहिल्यानंतरच मुखपृष्ठ करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्या प्रयोगात अभिनेते यशवंत दत्त यांनी साकारलेली सहा वेगवेगळी पात्रे पाहून आपण थक्क झालो होतो, असे त्यांनी नमूद केले. त्यानंतर एका दिवसात मुखपृष्ठाची रचना पूर्ण करून मोहन वाघ आणि वसंत कानेटकर यांना दाखवली. ते दोघांनाही ती रचना आवडली आणि तो आपल्या आयुष्यातील एक मोठा आशीर्वाद व सन्मान होता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Criticism on ruling party : विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन म्हणजे लोकशाहीची विटंबना !

राज ठाकरे यांनी मराठी रंगभूमीच्या त्या वैभवशाली परंपरेची आठवण करून देत आजच्या पिढीनेही नाटकांचा आस्वाद घ्यावा, तसेच नाटकांची पुस्तके वाचण्याची सवय पुन्हा जोपासावी, असे आवाहन केले. मराठी रंगभूमीवर ‘हाऊसफुल’चा बोर्ड कायम झळकत राहू दे आणि नाट्यप्रेमींच्या हातात पुन्हा पुस्तकांचे पान फडफडू दे, हीच आपली सदिच्छा असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे.