shivsena-thackeray-group-protest-for-farmers: अमेरिकेसोबतचा व्यापार करार रद्द करा; शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी
Akola शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि संपर्क नेते खासदार अरविंद सावंत तसेच उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. २६ फेब्रुवारी २०२६) अकोला जिल्ह्यात ३६ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनात शेतकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
केंद्र सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करारामुळे शेतमालाच्या किमती घसरल्याचा आरोप करत हा करार तात्काळ रद्द करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या करारामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते.
CM Devendra Fadnavis : ‘अजितदादांच्या आर्थिक शिस्तीचा आदर्श घेऊनच पुढे जातोय’
तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली पिक विम्याची हेक्टरी १७ हजार रुपयांची मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नसल्याने ती तात्काळ जमा करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
अकोला शहरासह तालुकानिहाय प्रमुख रस्त्यांवर, चौकांवर व ग्रामीण भागातील ठिकाणी आंदोलन झाले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलन शांततेत पार पडले असून ठिकठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख गोपाल दातकर आणि मंगेश काळे यांनी केले. “शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने रस्त्यावर उतरावे लागले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.








