Grampanchayat Election : ५१८ ग्रामपंचायतींवर सरपंचच प्रशासक; सहा महिन्यांसाठी अंतरिम व्यवस्था

Sarpanches-appointed-as-administrators-in-518-gram-panchayats : उपसरपंच व सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन; जि.प. सीईओ गुलाबराव खरात यांचे आदेश

Buldhana जिल्ह्यात जानेवारी व फेब्रुवारी २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ५२५ पैकी ५१८ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उपसरपंच व सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश गुलाबराव खरात, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांनी २५ फेब्रुवारी रोजी पारित केले.

अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या आदेशान्वये विघटित झालेल्या ५ ग्रामपंचायती तसेच मुदत समाप्तीच्या वेळी सरपंच व सदस्य पदे रिक्त असलेल्या २ ग्रामपंचायती अशा एकूण ७ ग्रामपंचायतींना या निर्णयातून वगळण्यात आले आहे.

ही नियुक्ती सहा महिने किंवा ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहे. ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालावा यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम १५१ अंतर्गत जिल्हा परिषद सीईओंना प्रशासक नेमण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्याच अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Walmik karad : बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टाचा झटका

तालुकानिहाय आकडेवारी

नियुक्त करण्यात आलेल्या ५१८ ग्रामपंचायतींपैकी –
देऊळगाव राजा – २५
मलकापूर – ३३
खामगाव – ७०
बुलढाणा – ५१
जळगाव जामोद – २२
संग्रामपूर – २७
लोणार – १५
चिखली – ५९
शेगाव – ३४
सिंदखेडराजा – ४३
नांदुरा – ४८
मोताळा – ५२
मेहकर – ३९

अशा एकूण ५१८ ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळणार असून उपसरपंच व सदस्यांची प्रशासकीय समिती त्यांना सल्ला व मान्यता देणार आहे.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी सांगितला टिपू सुलतानचा खरा इतिहास, काँग्रेस नेत्यांना सुनावले

प्रशासकांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 तसेच संबंधित नियम, शासन निर्णय व इतर कायद्यांच्या अधीन राहून प्रशासकीय समितीच्या सल्ल्याने कामकाज करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार या अंतरिम व्यवस्थेद्वारे चालणार असल्याने स्थानिक राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.