vidhan-parishad-election-2026-voting-for-11-seats-mahayuti-wins-6-unopposed : 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी
Mumbai : राज्यातील विधान परिषद निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर आज 17 पैकी 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या आधीच सहा जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवत राजकीय आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी महायुतीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उर्वरित 11 जागांसाठी आज स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांत मतदान होत असून अनेक मतदारसंघांतील लढती प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत.
यंदाच्या निवडणुकीत ठाणे, यवतमाळ, रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगर या सहा मतदारसंघांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर मतदारसंघातून भाजपचे अरुण लखाणी आणि अहिल्यानगर मतदारसंघातून भाजपचे प्राजक्त तनपुरे हे बिनविरोध विजयी झाले आहेत.
Legislative election: अमरावतीत काँग्रेसचा ‘गेम’; कोणाला मतदान करायचे?नगरसेवक संभ्रमात
आज ज्या 11 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे त्यामध्ये सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून मतदान केले जाणार आहे.
सोलापूर मतदारसंघात भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. या मतदारसंघाकडे विशेष लक्ष लागले असून दोन्ही पक्षांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत.
जळगाव मतदारसंघात तिरंगी लढत रंगली आहे. भाजपचे नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शरद तायडे आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. या मतदारसंघातील निकालाचा राज्याच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या निकालाकडे राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. महायुतीने आधीच सहा जागांवर बिनविरोध विजय मिळवल्याने त्यांची स्थिती मजबूत मानली जात असली तरी उर्वरित जागांवरील निकाल राजकीय समीकरणे निश्चित करणारे ठरणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षीय ताकद, आघाड्या आणि अपक्षांची भूमिका यामुळे अनेक मतदारसंघांतील निकाल उत्सुकतेचा विषय बनले आहेत.
आज पार पडणाऱ्या मतदानानंतर 22 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी सर्व जागांचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. विधान परिषदेतील संख्याबळ वाढविण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे निकालानंतर राज्याच्या राजकीय घडामोडींना नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
___








