Missing women : राज्यात बेपत्ता होणाऱ्या महिला-मुलींची वाढती संख्या चिंतेचा विषय

missing-women-and-girls-rise-buldhana-200-women-missing-igatpuri-minor-girls-case : बुलढाण्यात दोन महिन्यांत २०० हून अधिक महिला गायब, इगतपुरीत दोन मुलींचे अपहरण?

Mumbai : राज्यात बेपत्ता होणाऱ्या महिला आणि मुलींच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे बेपत्ता झाल्यानंतर या महिलांचे किंवा मुलींचे पुढे काय होते याबाबत अनेकदा स्पष्ट माहिती समोर येत नसल्याने पालक आणि कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. बुलढाणा जिल्ह्यात तर मुलींसह विवाहित महिला अचानक बेपत्ता होण्याच्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले असून दररोज सरासरी पाच ते सहा महिला किंवा मुली गायब होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यातील परिस्थिती अधिक चिंताजनक ठरत आहे. गेल्या २४ तासांत एका विवाहित महिलेसह पाच मुली आणि एक युवक असे सहा जण बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने प्रसिद्धीपत्रक काढत गेल्या वर्षी बेपत्ता झालेल्या महिलांपैकी सुमारे ८७ टक्के महिलांचा शोध लावण्यात यश आल्याचा दावा केला आहे. मात्र या दाव्यासंदर्भात कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आलेली नसल्याने या विषयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Bomb threat email : विधानभवनाला बॉम्बने उडवण्याची धमकी

यावर्षीच्या सुरुवातीपासूनच बुलढाणा जिल्ह्यात बेपत्ता होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. १ जानेवारी ते १० मार्च या कालावधीत जिल्ह्यातून एकूण २८९ जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त महिला आणि मुलींचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली असून प्रशासनाने याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातही अशाच प्रकारची घटना घडली आहे. टिटोली रेल्वे क्वार्टर परिसरातून १४ आणि ११ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. १० मार्च रोजी दुपारी सुमारे एक वाजल्यानंतर या दोन्ही मुली घरातून बाहेर पडल्या आणि त्यानंतर त्या परतल्या नाहीत. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलींना पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मुलींच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून इगतपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली असून सीसीटीव्ही फुटेज तसेच स्थानिकांकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दुसरीकडे बेपत्ता मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून ‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत बेपत्ता असलेल्या १२१ अल्पवयीन मुला-मुलींना शोधून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या मुलांपैकी काही प्रेमप्रकरणामुळे घरातून पळून गेले होते, तर काही जण कुटुंबातील वादामुळे घर सोडून गेले असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

Devendra fadanvis : मुनगंटीवारांच्या विक्रमी वृक्षलागवडीची आठवण; पुन्हा हरित महाराष्ट्राचा संकल्प

२० जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली होती. पुढील काळातही अशी मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांनी दिली आहे. तसेच ज्या पालकांच्या मुला-मुली बेपत्ता झाले आहेत त्यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यात वाढत असलेल्या या घटनांमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांकडून यावर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.