व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Rohit Pawar : महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते

Rohit Pawar : महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते

rohit-pawar-alleges-degree-scam-in-pune-university-demands-deep-investigation : पुणे विद्यापीठातील कथित घोटाळ्यावर रोहित पवारांचा गंभीर आरोप

Pune : राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर आधीच पेपरफुटीच्या घटनांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना आता पुणे विद्यापीठातील कथित पदवी घोटाळ्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. एका कर्मचाऱ्याने विद्यार्थ्याला तब्बल ७० हजार रुपयांत पदवी प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“पेपर फोडायचा, प्रवेश मिळवायचा आणि तीन-चार वर्षे शिक्षण घ्यायचे कशाला? महाराष्ट्रात तर आता थेट डिग्रीच विकत मिळते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी आता तरी झोपेतून जागे व्हावे,” अशा शब्दांत रोहित पवार यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.
या प्रकरणातील आरोपी कर्मचारी रमेश मुखेकर याला निलंबित करण्यात आले आहे. मात्र, एवढ्यावरच कारवाई थांबवून चालणार नाही, अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे. विद्यापीठातील काही कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच कुलगुरूंना पत्र लिहून पैसे घेऊन पदवी प्रमाणपत्रे दिली जात असल्याचा आरोप केला होता. मात्र, एक महिना उलटूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला.
रोहित पवार म्हणाले की, “माध्यमांनी आणि राजकीय नेत्यांनी हा मुद्दा उचलल्यानंतरच विद्यापीठ प्रशासनाला जाग आली. एका पदवीचा प्रकार समोर आला आहे, म्हणजे अशा अनेक पदव्या देण्यात आल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी करत रोहित पवार यांनी आरोपी रमेश मुखेकर याच्या मोबाईल फोनची आणि व्हॉट्सॲप चॅटची तपासणी करण्याची मागणी केली आहे.

Abhijeet Dipke : भाजपमध्ये या, नाहीतर ठोकू, कुटुंबालाही धमक्या दिल्याचा दावा

“२०१६ पासून रमेश मुखेकर त्या पदावर कार्यरत होता. त्यामुळे २०१५ पासूनच्या सर्व पदव्यांचे ऑडिट झाले पाहिजे. कोणत्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली, त्यामागे कोणते व्यवहार झाले, याचा शोध घेणे आवश्यक आहे,” असे त्यांनी म्हटले.

रोहित पवार यांनी हा प्रकार केवळ एका कर्मचाऱ्यापुरता मर्यादित नसल्याचा संशय व्यक्त केला आहे. “एफआयआर दाखल झाला आणि कर्मचाऱ्याला निलंबित केले म्हणजे प्रकरण संपले असे होत नाही. या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोण-कोण सहभागी आहे, याचा तपास झाला पाहिजे,” असे ते म्हणाले.
तसेच, या प्रकरणातील तक्रारदारांना निनावी फोन येत असल्याचाही दावा त्यांनी केला. “तक्रार करणाऱ्या गायकवाड आणि कदम यांना धमकीचे फोन येत आहेत. त्यामुळे हे जाळे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून त्यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे,” असा आरोप त्यांनी केला.
रोहित पवार यांनी या प्रकरणात विद्यापीठाशी संबंधित दोन कंपन्यांचा उल्लेख करत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “या कंपन्या विद्यापीठाच्या मालकीच्या असल्या तरी त्यामध्ये भाजप विचारसरणीचे लोक आहेत. राजेश पांडे नावाची व्यक्ती विद्यापीठात सक्रिय असते. त्याचा नेमका काय संबंध आहे आणि त्याचा प्रभाव किती आहे, याचाही तपास झाला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

CET-MPSC Paper leak: सीईटी-एमपीएससी पेपरफुटीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील उच्च शिक्षण व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुणे विद्यापीठ प्रशासनाने आरोपी कर्मचाऱ्याला निलंबित केले असले, तरी या कथित घोटाळ्यामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे.

error: Content is protected !!