Demand-to-grant-farmers-legal-permission-to-cultivate-Cannabis : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सरकारकडे मागणी
Malkapur सततच्या आर्थिक संकटामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकत असून अनेकजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या स्थितीत पोहोचत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी नियंत्रित आणि कायदेशीर चौकटीत गांजा लागवडीस परवानगी देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुबार पेरणी, अस्मानी संकटे, उत्पादन खर्चात वाढ आणि हमीभावाच्या प्रश्नामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडे स्थिर उत्पन्नाचा कोणताही पर्याय उरलेला नसल्याने अनेक शेतकरी नैराश्यात ढकलले जात आहेत.
Water crisis : ११३ कोटीची योजना, तरीही दोन वस्त्या कोरड्याच!
शासनाच्या धोरणांवरही निवेदनातून टीका करण्यात आली आहे. केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि शेतीला पर्यायी उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी नियंत्रित व कायदेशीर चौकटीत गांजा लागवडीस परवानगी देण्याचा विचार शासनाने करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळू ठाकरे, मलकापूर तालुका अध्यक्ष गोपाल सातव, अनिल इंगळे, वासुदेव बोरले यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.








