SIR-campaign-in-April-instructions-to-BLOs-to-intensify-mapping : बीएलओंना मॅपिंग वाढवण्याचे निर्देश, १० दिवसांत गृहभेटीवर भर
Amravati :निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष व्यापक पुनरिक्षण (SIR) मोहीम एप्रिल महिन्यात राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी सध्या सुरू असलेल्या मतदार मॅपिंगच्या कामावर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी आयोजित बैठकीत मतदारयाद्यांच्या दुरुस्ती व पुनरिक्षण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येरेकर यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाकडून सध्याच्या मतदारयाद्या २००२ सालच्या मतदारयाद्यांशी जुळविण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेत बीएलओंना प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन मॅपिंग करावे लागणार आहे. मॅपिंगदरम्यान न सापडलेल्या मतदारांच्या प्रकरणांची पाच दिवसांत सुनावणी घेणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४६ टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, येत्या १० दिवसांत हे प्रमाण किमान ८० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
Kiran Mahalle : माजी महापौरांचे पुनर्वसन, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगावर नियुक्ती
मॅपिंगचे काम गतीमान करण्यासाठी बीएलओंनी संबंधित मतदारांची यादी तसेच २००२ ची मतदारयादी तयार ठेवावी. त्यानंतर पुढील १० दिवसांत प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहितीची पडताळणी व जुळवणी करावी. यासाठी दोन स्वतंत्र ॲप्स विकसित करण्यात आले आहेत. तसेच, या कामासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. मॅपिंगचे प्रमाण वाढल्यास एप्रिलमध्ये होणाऱ्या विशेष पुनरिक्षण मोहिमेवरील ताण कमी होणार असल्याने मॅपिंगची टक्केवारी वाढवण्यावर भर द्यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.








