व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण स्व. गोवर्धन शर्मांवर टीका करण्याचा अधिकार नितीन देशमुखांना कोणी दिला? वैशाली शेळकेंचा...

स्व. गोवर्धन शर्मांवर टीका करण्याचा अधिकार नितीन देशमुखांना कोणी दिला? वैशाली शेळकेंचा सवाल

राजेश्वर मंदिराच्या विकासकामाचे श्रेय घेण्यावरून भाजपचा आमदार देशमुख आणि सादिक खान पठाण यांच्यावर निशाणा

Akola स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा यांच्या कार्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा हास्यास्पद प्रकार आहे. त्यांच्या कार्याची माहिती नसताना त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार आमदार नितीन देशमुख यांना कोणी दिला, असा सवाल भाजप महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष तथा माजी उपमहापौर वैशाली शेळके यांनी केला. राजेश्वर मंदिराच्या विकासकामाचे श्रेय घेण्यावरून त्यांनी आमदार नितीन देशमुख आणि आमदार सादिक खान पठाण यांच्यावर जोरदार टीका केली.

वैशाली शेळके म्हणाल्या की, स्वतःला मोठे समजणारे, प्रत्यक्ष कर्तृत्वापेक्षा केवळ बोलण्यावर भर देणारे आणि दादागिरीची भाषा करणारे नितीन देशमुख यांनी अकोल्याचे ग्रामदैवत असलेल्या राजेश्वर मंदिरासाठी आमदार सादिक खान पठाण यांनी निधी आणल्याचा दावा केला आहे. हा दावा अकोलेकरांना मान्य होणारा नाही. मंदिराच्या विकासकामाचे श्रेय घेण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.

स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा यांनी आपल्या सुमारे ३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक विकासकामांसोबतच मानवतेची आणि धार्मिक क्षेत्रातील कामे केली. अकोल्यातील रामनवमी उत्सव असो किंवा शहर-जिल्ह्यातील अन्य धार्मिक कार्यक्रम, प्रत्येक ठिकाणी ते अग्रेसर असायचे. पूरस्थिती असो किंवा मतदारसंघातील कावडधारी भाविकांना मदत करण्याचा विषय, त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. शेतकऱ्यांविषयीही त्यांना विशेष आपुलकी होती.

मतदार यादीतून पात्र नागरिकांची नावे वगळली जाणार नाहीत याची दक्षता घ्या; काँग्रेसचे स्पष्ट निर्देश

अकोल्यात भाजपची २५ वर्षे सत्ता असल्याचा उल्लेख करून अप्रत्यक्षपणे स्व. शर्मा यांच्या कार्यावर टीका करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार निंदनीय असून, महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा आहे, असेही शेळके यांनी म्हटले.

राजेश्वर मंदिराला ‘क’ आणि ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्याचा इतिहास

राजेश्वर मंदिराला प्रथम ‘क’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रकृती अस्वस्थ असतानाही स्व. आमदार गोवर्धन शर्मा आणि माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी पुढाकार घेतला होता. विजय अग्रवाल आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या माध्यमातून तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर मंदिराला ‘क’ वर्गाचा दर्जा मिळाला, असा दावा वैशाली शेळके यांनी केला.

मंदिराला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या प्रक्रियेत आमदार रणधीर सावरकर यांनी पुढाकार घेतला. तत्कालीन महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजेश्वर मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी कोल्हापूर येथील कलाकार आणि वास्तुविशारदांना बोलावून मंदिर विकासाचा आराखडा तयार करून घेण्यात आला. या प्रक्रियेच्या वेळी आमदार सादिक खान पठाण हे नगरसेवक होते, आमदार नव्हते, असे सांगत शेळके यांनी मंदिराच्या विकासकामातील त्यांच्या योगदानाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महसूलमंत्री बावनकुळे आणि अनंतराव देशमुखांमध्ये स्नेहमिलन भेट राजकीय चर्चांना उधाण!

या संदर्भातील सर्व कागदपत्रे दाखविण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार रणधीर सावरकर यांनी मंत्रालयातील २६ ठिकाणी पाठपुरावा करून मंदिराला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दर्जाला मंजुरी दिली असून, मंदिराच्या विकास आराखड्यासाठी निधी मिळावा याकरिता आमदार सावरकर सातत्याने पाठपुरावा करीत आहेत, असे शेळके यांनी स्पष्ट केले.

महायुतीच्या कामांवर जनतेचा विश्वास वाढत असल्याने काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून प्रत्येक विकासकामाचे श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे, असा आरोपही त्यांनी केला. भाजप आणि महायुतीच्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न देशमुख आणि पठाण यांनी करू नये, असे त्या म्हणाल्या.

स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा हे अकोलेकरांसह जिल्ह्यातील सनातन परंपरेवर श्रद्धा असणाऱ्या नागरिकांच्या मनात आदराचे स्थान असलेले नेतृत्व होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका करताना संबंधितांनी भान ठेवावे, असा सल्लाही वैशाली शेळके यांनी दिला.

 

error: Content is protected !!