Eknath shinde : विधान परिषदेत अनपेक्षित सूर; एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा

eknath-shinde-farewell-speech-uddhav-thackeray-mlc-session-maharashtra : निरोपाच्या भाषणात विरोधकांचेही कौतुक

Mumbai: मुंबईतील विधान परिषद अधिवेशनात राजकीय वातावरणात एक वेगळाच क्षण पाहायला मिळाला, जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका करण्याऐवजी निरोपाच्या भाषणात सर्व सदस्यांचे कौतुक करत सकारात्मक भूमिका मांडली. विशेष म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रथमच त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ‘साहेब’ असा उल्लेख करत त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या निरोप प्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे साहेब निरोप घेत आहेत, त्यांना निरोगी आयुष्य लाभो आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात क्षणभर शांतता पसरली आणि सर्वांचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे वेधले गेले.

Sindkhedraja grampanchayat : खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत बंडाची ठिणगी; सरपंचांविरोधात अविश्वास प्रस्ताव

या भाषणात शिंदे यांनी इतर सदस्यांचाही उल्लेख करत त्यांचे काम अधोरेखित केले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, त्या सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या नाहीत, परंतु २४ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी संयम आणि न्यायाची भूमिका कायम राखली. त्यांच्या विचारांची ठामता आणि सभागृहातील संतुलित वागणूक याचेही त्यांनी कौतुक केले.

Sudhir Mungantiwar : अधिकाऱ्यांची मुजोरी खपवून घेणार नाही! गोंडवाणा विद्यापीठाच्या उपकेंद्रावरून सुधीर मुनगंटीवार संतापले

तसेच अमोल मिटकरी यांच्याबद्दल बोलताना शिंदे म्हणाले की, “अमोल मिटकरी बस नावच पुरेसं आहे,” त्यांची वाणी प्रभावी असून आवाज बुलंद आणि झणझणीत आहे. विदर्भातील फायरब्रँड नेते म्हणून त्यांची ओळख असल्याचेही त्यांनी नमूद केले. संत साहित्याचा त्यांचा अभ्यास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ते प्रभावीपणे बोलतात, असेही त्यांनी सांगितले.

याचप्रमाणे रणजित मोहिते पाटील यांच्या कार्याचाही गौरव करत सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेतली. विनाकारण संघर्ष किंवा टीका न करता त्यांनी संयमाने राजकारण केल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

Protest by anganwadi karmachari : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार; FRS रद्द व शासकीय दर्जासाठी आंदोलन

शशिकांत शिंदे यांच्याविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “शशिकांत शिंदे आणि माझा जन्म एकाच मातीतला आहे. साताऱ्याची माती लढायला शिकवते.” सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारा नेता म्हणून त्यांनी त्यांचे कौतुक करत “शिंदे किसीसे डरते नहीं, मैदान छोडके भागते नहीं” अशा शब्दांत गौरव केला.

या संपूर्ण भाषणातून राजकीय मतभेद बाजूला ठेवून सहकाऱ्यांविषयी आदर व्यक्त करण्याचा सूर दिसून आला. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या शुभेच्छांमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले असून भविष्यातील राजकीय समीकरणांबाबतही विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

___