raymond-udyogpati-vijaypat-singhania-yanche-nidhan-mumbai-news : उद्योग, विमानचालन आणि उद्योजकतेतील एक युग संपले
Mumbai : देशातील आघाडीचे उद्योगपती, रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष आणि पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आलेले विजयपत सिंघानिया यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र आणि रेमंड समूहाचे विद्यमान अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी दिली. उद्योग, विमानचालन आणि सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या या दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने उद्योगविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
विजयपत सिंघानिया यांनी आपल्या दूरदृष्टी आणि नेतृत्वाच्या बळावर रेमंड या वस्त्र ब्रँडला राष्ट्रीय स्तरावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले. मुंबईत १९५८ साली सुरू झालेल्या पहिल्या रेमंड शोरूमपासून त्यांनी या ब्रँडचा विस्तार टप्प्याटप्प्याने वाढवला. १९६० मध्ये परदेशातून आधुनिक यंत्रसामग्री आयात करून उत्पादन प्रक्रियेत मोठे बदल केले आणि कंपनीला नवी दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली रेमंडने जागतिक बाजारपेठेत स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली.
१९८० मध्ये कंपनीची सूत्रे त्यांच्या हाती आल्यानंतर त्यांनी व्यवसाय विस्तारावर भर दिला. वस्त्र उद्योगापुरते मर्यादित न राहता त्यांनी विविध क्षेत्रांत प्रवेश केला. १९८६ मध्ये ‘पार्क अव्हेन्यू’ हा परफ्यूम ब्रँड सुरू करून त्यांनी ग्राहक उत्पादन क्षेत्रातही आपली छाप पाडली. १९९० मध्ये परदेशात पहिले शोरूम सुरू करून रेमंडला जागतिक व्यासपीठ मिळवून दिले.
विजयपत सिंघानिया हे केवळ उद्योगपती नव्हते, तर ते एक धाडसी एव्हिएटर म्हणूनही ओळखले जात होते. हॉट एअर बलूनद्वारे सर्वाधिक उंची गाठण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर असून त्यांच्या साहसी वृत्तीची ही साक्ष मानली जाते. उद्योग आणि साहस या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
दीर्घकाळ कंपनीचे नेतृत्व केल्यानंतर त्यांनी रेमंड समूहाची धुरा आपल्या मुलगा गौतम सिंघानिया यांच्याकडे सोपवली. त्यांनी आपल्या हिस्स्यांपैकी सुमारे ३७ टक्के भागीदारीही मुलाच्या नावावर केली होती. पुढे काही काळ वडील-मुलामध्ये मतभेद झाले होते, मात्र कालांतराने ते निवळले.
विजयपत सिंघानिया यांच्या पार्थिवावर आज, रविवारी दुपारी तीन वाजता मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने भारतीय उद्योगविश्वातील एक प्रेरणादायी पर्व संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.







