After Sudhir Mungantiwar’s meetings, the administration in the district has gone into ‘action mode’ on pending issues : चंद्रपूरचा विकास आणि जनतेच्या न्याय्य हक्कासाठी सुधीर मुनगंटीवार सरसावले
Chandrapur माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पोंभूर्णा तालुक्यातील गंगापूर नवीन गावाला महसुली दर्जा मिळवून देणे, रेल्वे अतिक्रमणधारकांचे मानवतावादी दृष्टिकोनातून पुनर्वसन करणे आणि महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडवणे, या प्रमुख विषयांवर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या.
पोंभूर्णा तालुक्यातील गंगापूर नवीन या पुनर्वसन गावाला स्वतंत्र महसुली दर्जा देण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. १९७४-७५ मध्ये वनविभागाकडून महसूल विभागाकडे जमीन हस्तांतरित होऊनही तांत्रिक त्रुटींमुळे ७/१२ संगणकीकरणात अडथळे येत होते. आ. मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील सर्व जुने रेकॉर्ड आणि अधिसूचना तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. या विषयावर १० एप्रिल रोजी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासोबत मुंबईत अंतिम बैठक होणार असून, अनेक वर्षांचा हा वन-जमीन वादाचा प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत.
रेल्वेच्या तिसऱ्या लाईनच्या कामामुळे बाधित होणाऱ्या चंद्रपुरातील सावरकर नगर, जलनगर, उडिया बस्ती यांसारख्या भागातील नागरिकांच्या पाठीशी मुनगंटीवार खंबीरपणे उभे राहिले आहेत. पुनर्वसनाशिवाय कोणतीही कारवाई करू नका, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. म्हाडामार्फत उभारल्या जाणाऱ्या घरांमध्ये लाभार्थ्यांना मोठी सबसिडी मिळवून देऊन, अवघ्या ३ ते ४ लाखांत हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. या प्रश्नी ते लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार आहेत.
Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांची दूरदृष्टी ठरली टर्निंग पॉइंट,चंद्रपूरात ‘ज्ञानगंगा’
चंद्रपूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन प्रलंबित आहे. या विषयाचे गांभीर्य ओळखून आ. मुनगंटीवार यांनी बैठकीतूनच आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. निधी वितरणातील तांत्रिक अडचणी आणि ‘युटिलायझेशन सर्टिफिकेट’मधील विलंब दूर करून कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तात्काळ अदा करण्याचे निर्देश त्यांनी दिले. हा प्रश्न केवळ चंद्रपूरपुरता मर्यादित न ठेवता ते राज्य पातळीवर मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडे पाठपुरावा करणार आहेत.
Sudhir Mungatiwar : चंद्रपूर बदलतोय वेगाने; मुनगंटीवारांच्या नेतृत्वात विकासाची नवी कहाणी
२० एप्रिलला चंद्रपुरात ‘राणी हिराई महोत्सव’
राजमाता राणी हिराई यांच्या जयंतीनिमित्त यंदा प्रथमच चंद्रपुरात भव्य ‘राणी हिराई महोत्सवा’चे आयोजन करण्यात येत असून, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य विभागाकडे पाठपुरावा करून २५ लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. राणी हिराई यांच्या गौरवशाली इतिहासाची ओळख नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पहिल्याच वर्षी महोत्सव भव्य, सुयोग्य आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी विशेष नियोजन सुरू असून, त्याच अनुषंगाने आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन २० एप्रिलच्या कार्यक्रमाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. आयोजन यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींवर चर्चा करून संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या.
या बैठकींना जिल्हाधिकारी वसुमना पंत, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुनगंटीवार यांच्या या धडाकेबाज पाठपुराव्यामुळे जिल्हयातील प्रशासकीय कामांना गती मिळाली असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे.








