sananda appeals akash fundkar to cancel proposed hike in property tax : खामगाव पालिकेच्या प्रस्तावीत करवाढ रद्द करण्याचे आवाहन
Khamgao खामगाव नगर परिषदेने प्रस्तावित केलेली मालमत्ता करवाढ सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी शासन दरबारी ठाम पाठपुरावा करून ही “अवाजवी आणि कथित बेकायदेशीर करवाढ” रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे जाहीर आवाहन केले आहे. सध्या आकाश फुंडकर हे महाराष्ट्राचे कामगार मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
सानंदा यांनी प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले की, करवाढीला खामगावकरांचा तत्त्वतः विरोध नाही. नियमाप्रमाणे दर चार वर्षांनी करवाढ होणे अपेक्षितच आहे; मात्र नगर परिषदेने नियमबाह्य पद्धतीने अव्वाच्या सव्वा दराने करवाढ लादल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे शहरातील मालमत्ता धारक, व्यापारी, व्यावसायिक आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, याविरोधात आंदोलनही उभारण्यात आले आहे.
Water crisis : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मेहकर तालुका तहानलेलाच
या करवाढीच्या प्रश्नावर केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनीही पुढाकार घेत डॉक्टर, वकील, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि शहरातील मालमत्ता धारकांची बैठक घेऊन प्रश्नाची सविस्तर चर्चा केली होती. सध्या ते केंद्र सरकारमध्ये आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून कार्यरत आहेत.
Uddhav Thackeray Shivsena : आधी नाकारले, आता थेट जिल्हाप्रमुख केले; चर्चा तर होणारच!
यानंतर हा मुद्दा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच नगरविकास विभागापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. त्याची दखल घेत १ एप्रिल २०२६ रोजी खामगाव नगर परिषदेच्या मालमत्ता करवाढीला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे सानंदा यांनी नमूद केले. नगरविकास विभागाकडून लवकरच या प्रकरणी सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यात आल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात स्थानिक पातळीवर प्रभावी प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचीच असल्याचे सांगत, त्यांनी हे “आपले प्रथम कर्तव्य” समजून करवाढ कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सानंदा यांनी केले.








