president, vice-president unopposed in district bank elections : कोरपे यांच्या तिसऱ्या पिढीकडे नेतृत्व, अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड बिनविरोध
Akola अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. जयराज संतोषकुमार कोरपे तर उपाध्यक्षपदी रामेश्वर सुभाषराव ठाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेच्या सभागृहात झालेल्या नवनिर्वाचित संचालकांच्या पहिल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. या प्रक्रियेनंतर जिल्हा बँकेवर घराणेशाहीची मोहोर उमटल्याचे बोलले जात आहे.
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नेतृत्व कोरपे कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील सदस्य करीत आहे. यापूर्वी सहकार महर्षी डॉ. वामनराव रामकृष्ण उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांनी बँकेचे अध्यक्षपद भूषिविले आहे. त्यानंतर त्यांचा मुलगा डॉ. संतोषकुमार कोरपे आणि आता तिसऱ्या पिढीतील डॉ. जयराज संतोषकुमार कोरपे हे बँकेचे अध्यक्ष झाले आहेत.
निवडणूक प्रक्रियेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने डॉ. जयराज कोरपे आणि रामेश्वर ठाकरे यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गीतेशचंद्र साबळे यांनी केली.
Vikas Thakre : विकास ठाकरेंची ‘इनिंग’ संपणार? शहर काँग्रेसच्या नव्या ‘कॅप्टन’साठी निरीक्षक नागपुरात!
दरम्यान, डॉ. जयराज कोरपे हे माजी अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांचे पुत्र असून, रामेश्वर ठाकरे हे वाशिमचे माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यामुळे दोन्ही प्रमुख पदांवर राजकीय घराण्यांतील वारसांना संधी मिळाल्याने जिल्हा बँकेवर घराणेशाहीची छाप पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यापूर्वी ३० मार्च रोजी जाहीर झालेल्या निवडणूक निकालात सहकार पॅनलने सर्व २१ संचालक पदांवर विजय मिळविला होता. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी ही पहिली सभा घेण्यात आली.
या सभेला डॉ. संतोषकुमार कोरपे, गोपाल काकड, अजिंक्य राऊत, कल्पना पाचपोर, अरविंद इंगोले, रामेश्वर वाघ, अनिलकुमार जाधव, जावेद उल्लाह खान पटेल, डॉ. धीरज देशमुख, उषा हिंगणकर, संदीप खारोडे, अभिषेक तिडके, धनंजय गोरे, शोभा झनक, नितीन जाधव, विश्वनाथ ताथोड, ललित बहाळे, गीता ठाकरे, अपर्णा धोत्रे यांच्यासह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य उपस्थित होते. दरम्यान, आमदार देशमुख यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे स्वागत करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.








