व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Kishor jorgewar : चंद्रपूरमधून आमदार जोरगेवार ‘आऊट’? भाजपचे प्रभारी जाहीर

Kishor jorgewar : चंद्रपूरमधून आमदार जोरगेवार ‘आऊट’? भाजपचे प्रभारी जाहीर

MLA Jorgewar ‘out’ from Chandrapur? BJP appoints in-charge : मनमानीला लगाम; भाजपने जोरगेवारांचे राजकीय पंख छाटले

Chandrapur : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना आव्हान देणाऱ्या आणि पक्षाची शिस्त वारंवार पायदळी तुडवणाऱ्या चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना अखेर पक्षाने त्यांची जागा दाखवून दिली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जाहीर केलेल्या विधानसभा जिल्हा प्रभारींच्या यादीतून जोरगेवार यांना पूर्णपणे ‘आऊट’ करण्यात आले असून, हा त्यांच्याविरुद्धच्या कारवाईचा श्रीगणेशा मानला जात आहे.

चंद्रपूर महापालिका निवडणुकीत पक्षाची अधिकृत यादी बदलण्यापासून ते ‘एबी फॉर्म’च्या चोराचोरीपर्यंतच्या प्रकरणांमुळे भाजपची मोठी नाचक्की झाली होती. या सर्व प्रकरणाचे सूत्रधार म्हणून आमदार जोरगेवार यांच्याकडे पाहिले जात होते. या शिस्तभंगाची गंभीर दखल घेत पक्षाने आता त्यांना एकाही मतदारसंघाचे प्रभारी पद दिलेले नाही. विशेष म्हणजे, ज्या चंद्रपूर शहरावर जोरगेवार आपला दावा सांगत होते, त्या शहराची जबाबदारी माजी मंत्री मदन येरावार यांच्याकडे, तर चंद्रपूर ग्रामीणची सूत्रे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.

Vijay Wadettiwar : अख्खा सातबारा कोरा करा, दोन लाखांनी काय होणार? काँग्रेस नेत्याचा सवाल

काही काळापूर्वी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी, भाजपमध्ये कोणाचेही अतिरिक्त लाड खपवून घेतले जात नाहीत, योग्य वेळी योग्य ठिकाणी दखल घेतली जाते, असे सूचक विधान केले होते. आज जाहीर झालेल्या यादीमुळे मुनगंटीवारांचा तो इशारा तंतोतंत खरा ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जोरगेवारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून ज्येष्ठ नेत्यांशी घेतलेला पंगा आणि स्वतःच्या मनमर्जीने चालवलेला कारभार आता त्यांच्या अंगाशी आला आहे.

Water shortage : दुसरबीडमध्ये पाणी पेटले! गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक

भाजपने जाहीर केलेल्या यादीनुसार, विदर्भातील इतर महत्त्वाच्या नेत्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आमदार बंटी भांगडिया यांच्याकडे भंडारा, परिणय फुके यांच्याकडे गडचिरोली आणि गोंदिया, तर प्रवीण दटके यांच्याकडे नागपूरची धुरा सोपवण्यात आली आहे. मात्र, चंद्रपूरचे आमदार असूनही जोरगेवारांना साध्या जिल्हा प्रभारी पदावरूनही दूर ठेवल्याने त्यांचे राजकीय पंख छाटल्याचे स्पष्ट झाले आहे.

पक्षाच्या या कठोर भूमिकेमुळे जोरगेवार समर्थकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली असून, आगामी काळात चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, सध्या तरी “शिस्त मोडणाऱ्याला थारा नाही,” असा स्पष्ट संदेश भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने या नियुक्तीतून दिला आहे.

error: Content is protected !!