high voltage drama between AIMIM and muslim league: जिचकारांच्या नावावरून चव्हाट्यावर आली गटबाजी, मुदत संपल्याने दोन्ही पक्षांच्या संधीवर पाणी
Nagpur नागपूर महानगरपालिकेत प्रथमच सहा जागा जिंकून इतिहास घडवणाऱ्या एमआयएममध्ये स्वीकृत सदस्याच्या निवडीवरून अक्षरशः राडा झाला आहे. एमआयएम आणि मुस्लिम लीगच्या युतीला मिळणारी हक्काची एक जागा अंतर्गत कलह आणि गटबाजीमुळे धोक्यात आली असून, अखेर अर्ज भरण्याची मुदत संपल्याने दोन्ही पक्षांना या संधीवर पाणी सोडावे लागले आहे. या संपूर्ण नाट्याच्या केंद्रस्थानी असलेले काँग्रेसचे निलंबित नेते नरेंद्र जिचकार यांच्या उमेदवारीवरून पक्षातील दोन गट समोरासमोर ठाकले आणि महापालिका मुख्यालयातच मोठा वाद रंगला.
नागपूर महापालिकेत एमआयएमचे ६ आणि मुस्लिम लीगचे ४ असे एकूण १० नगरसेवक असून तांत्रिकदृष्ट्या या गटाला एक स्वीकृत सदस्य निवडून देण्याचा अधिकार आहे. मात्र, ही जागा पदरात पाडून घेण्याऐवजी दोन्ही पक्षांतील नेत्यांनी एकमेकांचे पाय खेचण्यातच धन्यता मानली. सूत्रांनुसार, एमआयएम आणि मुस्लिम लीगच्या मोजक्या सदस्यांनी पक्षाच्या धोरणांना बगल देत नरेंद्र जिचकार यांचे नाव गुपचूप निश्चित केले होते. स्वतः जिचकार हे महापालिकेतील मुस्लिम लीगच्या कक्षात बसून अर्ज भरण्याची तयारी करत होते. मात्र, ही छुपी योजना इतर नगरसेवकांच्या लक्षात येताच संतापाचा उद्रेक झाला आणि गटनेत्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून असलेल्या सदस्यांनी त्यांना आयुक्तांकडे जाताना वाटेतच रोखले.
loksabha seats : लोकसभेतील जागा ५४५ वरून ८५० करण्याचा प्रस्ताव !
यावेळी महापालिका मुख्यालयात दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की प्रकरण थेट आयुक्तांपर्यंत पोहोचले. आयुक्तांनीही आधी आपसात एकमत करा, मगच नाव घेऊन या असा सल्ला देत त्यांना बाहेर पाठवले. या गोंधळात आणि एकमेकांवरील आरोपांत दुपारी तीन वाजेची अंतिम मुदत निघून गेली आणि एमआयएम-मुस्लिम लीगची युती स्वीकृत सदस्य देण्यात सपशेल अपयशी ठरली. विशेष म्हणजे, एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षांनी ‘एक्स’वरून वेगळे नाव सुचवले असताना स्थानिक पातळीवर जिचकारांसाठी झालेली ही ‘फिल्डिंग’ सर्वांच्याच भुवया उंचावणारी ठरली.
नरेंद्र जिचकार हे काँग्रेसचे माजी पदाधिकारी असून शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्याशी असलेल्या वादातून त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांनी ठाकरेंविरोधात विधानसभा निवडणुकीत बंडखोरीही केली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये परतण्याचे त्यांचे सर्व मार्ग बंद झाल्याने त्यांनी एमआयएमच्या माध्यमातून महापालिकेत शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. जरी जिचकार यांनी “मी वैयक्तिक कामासाठी आलो होतो” असा दावा करत सारवासारव केली असली, तरी या वादामुळे एमआयएम आणि मुस्लिम लीगची शहरात मोठी नाचक्की झाली आहे. आता या रिक्त जागेसाठी या गटाला किमान दोन महिने वाट बघावी लागणार आहे.








