व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Nagpur municipal corporation : काँग्रेसमध्ये ‘स्वीकृत’वरून ठिणगी; ४६ वर्षांची निष्ठा वाऱ्यावर, ज्येष्ठ...

Nagpur municipal corporation : काँग्रेसमध्ये ‘स्वीकृत’वरून ठिणगी; ४६ वर्षांची निष्ठा वाऱ्यावर, ज्येष्ठ नेते कमलेश समर्थांचा राजीनामा!

Senior Congress leader resigns as co-opt member selection exposed internal conflict within party : अंतर्गत असंतोषाचा मोठा स्फोट, नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न

Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यांच्या नावांची घोषणा होताच शहरात काँग्रेसमधील अंतर्गत असंतोषाचा मोठा स्फोट झाला आहे. तब्बल ४६ वर्षांपासून पक्षासाठी समर्पित असलेले ज्येष्ठ नेते आणि प्रदेश सचिव कमलेश समर्थ यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या राजीनाम्यामुळे नागपूर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

काँग्रेसने स्वीकृत सदस्यत्वासाठी प्रदेश सचिव केतन ठाकरे आणि महासचिव अतुल कोटेजा यांची नावे निश्चित केली आहेत. केतन ठाकरे हे शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी अद्याप एकही निवडणूक लढवली नसतानाही त्यांना मिळालेली संधी आणि दुसरीकडे ४६ वर्षांचा अनुभव असलेल्या निष्ठावान कार्यकर्त्याला डावलल्याने पक्षात नाराजी पसरली आहे.

Baramati by election : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला वेग

कमलेश समर्थ यांनी प्रभाग क्रमांक २० मधून महापालिकेची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. हा प्रभाग काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, त्यावेळी त्यांना तिकीट नाकारून अवघ्या सहा महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी समर्थ यांना स्वीकृत सदस्यत्वाचा शब्द देण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या नावाची साधी शिफारसदेखील करण्यात आली नाही. यामुळे संताप व्यक्त करत समर्थ यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

Nagpur municipal corporation: नागपूर महापालिकेत भाजपकडून ‘युती धर्म’, शिवसेनेच्या सूरज गोजेंना लॉटरी

आपल्या पत्रात समर्थ यांनी अत्यंत तिखट शब्दांत आपली भावना व्यक्त केली आहे. पक्षाने माझ्या निष्ठेचा विचार केला नाही. अनेक जुन्या लोकांनी संधी मागितली होती, पण त्यांना डावलले गेले. हे बघता आता माझी पक्षाला गरज उरली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, ज्यांना पदे दिली गेली आहेत, त्यांच्या स्वतःच्या बूथवर पक्षाला किती मते मिळाली, याचे ऑडिट प्रदेशाध्यक्षांनी करावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Nagpur municipal corporation : नागपूर भाजपमध्ये अखेर ‘डॅमेज कंट्रोल’; नाराजांचे राजकीय पुनर्वसन!

कमलेश समर्थ यांचा राजकीय प्रवास मोठा असून त्यांनी १९९४ मध्ये नागपूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते. तसेच १८ वर्षे शहर काँग्रेसचे महासचिव, २०१४ मध्ये उत्तर प्रदेशातील कोशांभी लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक, राजस्थानमधील हिंडोन सिटी आणि पाली लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक, तसेच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीतही निरीक्षक म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. इतका प्रदीर्घ अनुभव पाठीशी असलेल्या नेत्याला डावलल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट असून, आगामी काळात याचे पडसाद नागपूरच्या राजकारणात उमटण्याची चिन्हे आहेत.

error: Content is protected !!