Vanchit Bahujan Aghadi jumps into the Gaikwad–Shinde row, demands a probe : राजकीय आरोपांमुळे बुलढाण्याची प्रतिमा धोक्यात, वंचित आघाडीला चिंता
Buldhana शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि माजी आमदार तसेच भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
येळगाव येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींबाबत आमदार गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संबंधित मुलींची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या वक्तव्यामुळे केवळ संबंधित विद्यार्थिनींची बदनामी झाली नसून जिल्ह्याची प्रतिमाही डागाळल्याची टीका करण्यात आली.
Mahayuti Government : राज्यातील १७ लाख कर्मचारी पुन्हा संपावर; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प?
यासंदर्भात जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. दोन्ही नेत्यांच्या वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांमुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण गढूळ होत असून, याचा व्यापक परिणाम जिल्ह्याच्या प्रतिमेवर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. वंचित बहुजन आघाडीने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, तातडीने चौकशीचे आदेश न दिल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी अॅड. अमर इंगळे, शेषराव मोरे, मनोज खरात, समाधान डोंगरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.







