BJP CONGRESS word war on nari shakti vandan bill : सर्वच पक्षांच्या पाठिंब्याने मंजूर करण्यात आलेले विधेयक लागू का करत नाही, काँग्रेसचा सवाल
Nagpur सध्या महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये तीव्र शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. दोन्ही पक्षांच्या वतीने दावे-प्रतिदावे करत एकमेकांना टार्गेट केले जात असून, ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ रोखून काँग्रेसने पाप केल्याचा आरोप भाजप करत आहे. या आरोपाला काँग्रेसनेही नागपुरात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. २०२३ मध्ये सर्वच पक्षांच्या पाठिंब्याने मंजूर करण्यात आलेले महिला आरक्षण विधेयक भाजप सरकार नेमके लागू का करत नाही, असा रोखठोक सवाल आता विचारला जात आहे.
काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय प्रवक्ते अवनी बंसल यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना या विषयावर भाजपवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्ये काँग्रेस आणि सर्व विरोधकांच्या समर्थनाने मंजूर झाले होते. मात्र, ते लागू करण्याचे सोडून भाजप केवळ वेगळ्या विषयांवर चर्चा घडवून जनतेची दिशाभूल करत आहे. जर भाजपला खरोखरच महिलांना न्याय द्यायचा असेल, तर त्यांनी या विधेयकाची तत्काळ अंमलबजावणी करावी. २०१४ मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महिला आरक्षण लागू करण्याची मागणी केली होती, याची आठवणही बंसल यांनी करून दिली.
महिला आरक्षण विधेयकात ‘परिसीमन’ (मतदारसंघ पुनर्रचना) सारख्या गुंतागुंतीच्या अटी जोडण्याची अजिबात आवश्यकता नव्हती, असे सांगत बंसल यांनी भाजपच्या हेतूवर शंका उपस्थित केली. परिसीमन आणि जनगणना या विषयांवर व्यापक चर्चा करून सर्वांना विश्वासात घेण्याची गरज असताना भाजपने तसे केले नाही. जर सरकार गंभीर असेल, तर सध्याच्या ५४३ लोकसभा जागांच्या आधारावरच आरक्षण लागू करावे, असेही त्यांनी सुचवले. पंतप्रधान केवळ त्यांच्या इच्छेनुसारच निर्णय लादत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
Ashok uikey : राळेगाव प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई होणार
यावेळी बोलताना त्यांनी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही ताशेरे ओढले. संघात महिलांना योग्य स्थान आणि अधिकार दिले जात नाहीत, अशी टीका त्यांनी केली. तसेच २०११ नंतर २०२१ मध्ये जनगणना होणे आवश्यक होते, मात्र भाजपने ती जाणीवपूर्वक सहा वर्षे टाळली आहे. यावरून भाजपला ओबीसी महिलांना आरक्षण द्यायचे नाही, हेच स्पष्ट होत असल्याचे बंसल म्हणाले. महिला आरक्षण हा त्यांचा अधिकार असून, सर्व महिलांनी आता आपल्या राजकीय पक्षाच्या चौकटीतून बाहेर पडावे आणि आरक्षण प्रत्यक्ष लागू करण्यासाठी एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.








