व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vidhan parishad election : भाजपच्या सहा उमेदवारांच्या नावांवर आज अंतिम मोहर !

Vidhan parishad election : भाजपच्या सहा उमेदवारांच्या नावांवर आज अंतिम मोहर !

maharashtra-vidhan-parishad-election-2026-bjp-core-committee-meeting-candidates-discussion : भाजपच कोअर कमिटीची निर्णायक बैठक

Mumbai : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 पार्श्वभूमीवर भाजपमध्ये हालचालींना वेग आला असून आज रात्री दहा वाजता वर्षा निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीनंतर काही निवडक नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

विधान परिषदेच्या दहा जागांपैकी सुमारे सहा जागा भाजपच्या वाट्याला येतात, या सहा जागांसाठी संभाव्य उमेदवारांची छाननी सुरू आहे. पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम केलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा विचारही बैठकीत मांडला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर जातीय आणि प्रादेशिक समतोल राखण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे.

दरम्यान, पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. काँग्रेसमधून राजीनामा देऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ जुलै 2030 पर्यंत होता.

Amravati congress : काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांवर नाराजी, १४ नेत्यांचे पदासाठी अर्ज!

विधान परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांकडून हालचालींना वेग आला असून गाठीभेटी, लॉबिंग आणि राजकीय संपर्क वाढले आहेत. सह्याद्री अतिथीगृह तसेच मुंबईतील विविध बैठकींमध्ये इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी या नावांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ नियमित जागांसह एका पोटनिवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. 23 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार असून 30 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल. 2 मे रोजी अर्जांची छाननी होईल तर 4 मे ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. 12 मे रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया 13 मेपर्यंत पूर्ण होणार आहे.

Nari shakti vandan vidheyak : भाजपचा खटाटोप सत्ता टिकवण्यासाठी, काँग्रेसची टीका

या निवडणुकीत 10 पैकी 9 जागा महायुती सहज जिंकू शकते, असे राजकीय गणित सांगितले जात आहे. 9 जागांसाठी 29 मतांचा कोटा असणार असून एका जागेसाठी 51 टक्के मतांची अट असेल. त्यामुळे महाविकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत आमदारांना दोन वेळा मतदान करावे लागणार आहे.

दरम्यान, विधान परिषदेतील उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याच्या राजकारणात मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.

error: Content is protected !!