maharashtra-vidhanparishad-election-2026-mahayuti-candidates-bjp-list : भाजपची ३० नावांची यादी दिल्लीला, इच्छुकांचे ‘देव पाण्यात’
Mumbai : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुतीत उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. संख्याबळाच्या गणितानुसार महायुतीला अधिक जागा मिळण्याची शक्यता असल्याने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यात इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. परिणामी अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली असून “देव पाण्यात” ठेवून राजकीय लॉबिंग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी तब्बल ३० जणांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहे. या यादीत केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, मनोज कोटक, माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, अर्चना पाटील चाकूरकर, संदीप जोशी यांसारख्या नावांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत संघटनात्मक कामगिरी करणाऱ्या तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. दिल्लीला यादी पाठवण्यापूर्वी वर्षा निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या असून विभागनिहाय नावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
Vijay Wadettiwar : भाजपचा ‘असली’ चेहरा उघड; महिला आरक्षणाच्या नावाखाली देशाची दिशाभूल!
दरम्यान, प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानपरिषदेतील एकूण जागांपैकी भाजपच्या वाट्याला पाच ते सहा जागा येऊ शकतात, त्यामुळे पक्षात उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे केवळ एका जागेची शक्यता असतानाही सहा जण इच्छुक असल्याने अंतर्गत स्पर्धा तीव्र झाली आहे. राजेंद्र जैन, अनिकेत तटकरे, आनंद परांजपे, सुनील टिंगरे, उमेश पाटील आणि विक्रम काकडे ही नावे चर्चेत असून अंतिम निर्णय घेताना सुनेत्रा पवार यांची कसोटी लागणार असल्याचे बोलले जात आहे. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक असून राष्ट्रवादीकडे असलेले संख्याबळ पाहता एकच जागा मिळण्याची शक्यता अधिक आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे शिंदे यावेळीही धक्कातंत्र वापरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उमेदवार निवडीत कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीलाही एक जागा मिळण्याची शक्यता असून त्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांचे नाव आघाडीच्या घटक पक्षांकडून पुढे केले जात आहे. काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्षांकडून ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह धरण्यात आल्याची माहिती आहे.
१२ मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीत सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत उमेदवार निवड आणि राजकीय घडामोडींना वेग येणार असून महायुतीतील अंतर्गत स्पर्धा आणि रणनीती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
___








