union minister C. R. Patil slams the opposition over women’s reservation : गुजरातमध्ये १० हजार जागांपैकी ५ हजार महिला रिंगणात असल्याचा दावा
Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिला आरक्षण विधेयक आणून महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले असताना, भाजप नेते व केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. महिलांना त्यांचे अधिकार देण्याची पंतप्रधान मोदींची प्रामाणिक मंशा आहे, मात्र विरोधकांनी नेहमीच महिलांचे हक्क हिरावून घेण्याचे काम केले आहे, असा आरोप त्यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केला.
गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के महिला निवडणूक लढवत असून १० हजार जागांपैकी ५ हजार महिला रिंगणात आहेत, हे महिला सक्षमीकरणाचे मोठे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
पाटील यांनी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर निशाणा साधताना म्हटले की, विरोधकांनी नेहमी आपल्या कुटुंबातील महिलांनाच राजकारणात संधी दिली. मात्र, जेव्हा देशातील सामान्य महिलेला अधिकार देण्याची वेळ आली, तेव्हा विरोधक आणि त्यांच्या पक्षातील महिला नेत्यांनीही याला विरोध केला. यापूर्वी जेव्हा सभागृहात हे बिल आले होते, तेव्हा काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि आरजेडी या पक्षांनी अत्यंत टोकाचा विरोध करून बिलाची प्रत फाडण्यापर्यंत मजल मारली होती. संसदेत या विषयावर चर्चा सुरू असताना राहुल गांधी यांचे वर्तनही गंभीर नव्हते, अशी टीका पाटील यांनी केली.
Nitin Raut : नितीन राऊतांना धक्का; महापालिकेत केतन ठाकरे झाले ‘स्वीकृत’
दक्षिण भारतातील जागांच्या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी आधीच स्पष्टीकरण दिल्याचे सांगत पाटील यांनी लोकसंख्या वाढीचा दाखला दिला. १९७१ मध्ये देशाची लोकसंख्या ५४ कोटी होती, जी आता तीन पटीने वाढली आहे, त्यामुळे त्या प्रमाणात सदस्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. भाजप आणि एनडीए हे विधेयक पारित करण्यासाठी पूर्णपणे संकल्पबद्ध असून, याला विरोध करणाऱ्यांचा हिशोब देशाची जनता नक्कीच चुकता करेल, असा इशाराही त्यांनी दिला.








