Municipal garbage scam: Double the amount of collected penalties diverted to contractors, alleges Vikas Thakre : विकास ठाकरेंचा खळबळजनक आरोप, जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी
Nagpur नागपूर महानगरपालिकेचा कचरा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, प्रशासनाकडून कंत्राटी कंपन्यांचे ‘अती लाड’ सुरू असल्याचा गंभीर आरोप पश्चिम नागपूरचे आमदार व शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला आहे. नागपूर महानगरपालिकेने दोन कचरा ऑपरेटर्सकडून सुमारे १९ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आणि उलट त्यांनाच ३३.५० कोटी रुपये विविध माध्यमांतून परत केले, असा खळबळजनक दावा ठाकरेंनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणात सामील असलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून ‘AG Enviro’ आणि ‘BVG India’ या दोन्ही ऑपरेटर्सचे करार त्वरित रद्द करण्यात यावेत, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीत विकास ठाकरे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र ताशेरे ओढले आहेत. नोव्हेंबर २०१९ पासून या दोन ऑपरेटर्सना मनपाने ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम अदा केली आहे, तरीही कचरा संकलनाच्या सर्वच स्तरांवर हे ऑपरेटर्स अपयशी ठरले आहेत. जानेवारी २०२२ मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने या कंपन्यांचा करार रद्द करण्याचा ठराव मंजूर केला होता, मात्र प्रशासनाने अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही. उलट, या ऑपरेटर्सवर कडक दंड आकारणे अपेक्षित असताना केवळ १९ कोटींचा जुजबी दंड आकारून त्यांना पाठीशी घालण्यात आले.
Nitin Gadkari : ‘२४/७’ पाणी योजनेवरून गडकरी पुन्हा बरसले, प्रशासनावर व्यक्त केला संताप
करारातील अटींनुसार घराघरातून कचरा संकलन करणे, १० गार्बेज ट्रान्सफर स्टेशन उभारणे, कचऱ्याचे कॉम्पॅक्टर्समध्ये हस्तांतरण करणे आणि आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्याची सर्व जबाबदारी या कंपन्यांची होती. मात्र, मनपाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून ही सर्व कामे सार्वजनिक निधीतून करून घेतली आणि ऑपरेटर्सना थेट आर्थिक लाभ मिळवून दिला. यामध्ये २०२२ मध्ये ट्रान्सफर स्टेशनसाठी १ कोटींचे सिमेंट प्लॅटफॉर्म बांधणे, २०२४ मध्ये ३० कोटी रुपये खर्च करून ५० कॉम्पॅक्टर्स व १० हुक-लोडर्स खरेदी करणे आणि आता अलीकडे २.५० कोटी रुपये खर्च करून २५ नवीन ऑटो-टिपर्स कंत्राटदारांना देणे, अशा धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
Sudhir Mungantiwar : शब्द दिला की पूर्ण करतात; म्हणूनच वेगळे ठरतात मुनगंटीवार!
हा स्पष्टपणे मोठा घोटाळा असून जनतेच्या पैशांची ही लूट थांबवणे अत्यावश्यक आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, ज्यावर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. आता राज्य सरकारने सभागृहात दिलेले हे आश्वासन तात्काळ अमलात आणून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे आवाहन विकास ठाकरे यांनी केले आहे.








