Sudhir Mungantiwar interacts with ‘Youth Warriors’, says politics is not just about elections : राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नव्हे, ‘युवा वॉरियर्स’शी साधला संवाद
Nagpur राजकारण म्हणजे केवळ सत्ता मिळवणे किंवा निवडणुका जिंकणे नव्हे, तर शेवटच्या घटकाची सेवा करणे होय. निवडणूक हा १०० मार्कांच्या पेपरमधील केवळ ५ मार्कांचा प्रश्न आहे, उरलेले ९५ गुण हे लोकसेवेचे आहेत. त्यामुळे गरिबांच्या सन्मानार्थ, युवा वॉरियर्स मैदानात ही भावना उरात बाळगून स्वतःला झोकून द्या, असे प्रेरणादायी आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
नागपूर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात भारतीय जनता युवा मोर्चाच्या ‘युवा वॉरियर्स’ नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आणि भव्य युवा संमेलन पार पडले. यावेळी मुनगंटीवार यांनी तरुणांना राजकारणाची नवी व्याख्या सांगत समाजकार्याचा मंत्र दिला.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुनगंटीवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची स्थापना केवळ निवडणुकांसाठी झालेली नाही. ६ एप्रिल १९८० रोजी मुंबईत अटलजींनी जो विचार मांडला, तोच विचार आजही पक्षाचा कणा आहे. सत्ता आपल्यासाठी साध्य नाही, तर ते समाजपरिवर्तनाचे एक साधन आहे. गरिबांच्या झोपडीपर्यंत विकास पोहोचवणे हेच आपले मुख्य ध्येय असायला हवे, असे त्यांनी ठामपणे मांडले.
Sudhir Mungantiwar : शब्द दिला की पूर्ण करतात; म्हणूनच वेगळे ठरतात मुनगंटीवार!
युवा वॉरियर्सचा ‘मिशन १५४’ संकल्प
नागपूरमधील १५४ वॉर्डांमध्ये प्रत्येकी ३० युवा वॉरियर्स तयार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या उपक्रमाचे कौतुक करताना मुनगंटीवार म्हणाले की, नागपूर हे देशाला ऊर्जा देणारे केंद्र आहे. येथील युवाशक्तीने जिद्दीच्या जोरावर काम केल्यास संपूर्ण देशासाठी एक नवा आदर्श निर्माण होईल. १७ ते २५ वयोगटातील तरुणांनी ‘विकसित आणि संस्कारित’ भारताचा धागा बनावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
२०४७ च्या महासत्तेसाठी तरुणाईची गरज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला आत्मनिर्भर बनवण्याचे जे स्वप्न पाहिले आहे, ते पूर्ण करण्याची जबाबदारी युवा वॉरियर्सवर आहे. भयमुक्त, भूकमुक्त आणि बेरोजगारीमुक्त भारतासाठी तरुणांनी सक्रीय राजकारणात येणे आवश्यक आहे. चांगले लोक राजकारणात आले नाहीत, तर स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे पद विसरा आणि कामाची भावना मनात ठेवून शेवटच्या माणसाला जोडा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या सोहळ्याला नागपूर महानगर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार सुधाकर कोहळे, श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे, इशांत जैन, संजय अडसड, अथर्व त्रिवेदी, बादल राऊत यांसह अनेक मान्यवर आणि शेकडो युवा कार्यकर्ते उपस्थित होते.








