Demand for criminal action against Shyam Manav over objectionable remarks about Sant Gulab Baba : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षाची तक्रार, तीव्र आंदोलनाचा इशारा
Nagpur अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली संतांची बदनामी करून समाजात तेढ निर्माण करणारे श्याम मानव यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. संत गुलाब बाबा यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत आणि आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी श्याम मानव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘गुलाब बाबा सेवाश्रम’ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी तक्रार नोंदवली आहे. मानव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला नाही तर नागपुरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा देण्यात आला.
सध्या नागपुरात श्याम मानव यांचे ‘बुवा तिथे बाया’ हे व्याख्यान गाजत असून, या दरम्यान त्यांनी खरात फाईल आणि बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्यावर टीका करताना संत गुलाब बाबा ओढले. संत गुलाब बाबा स्वतःला श्रीकृष्णाचा अवतार समजायचे आणि महिला त्यांना दूध-दह्याने आंघोळ घालायच्या, असे विधान श्याम मानव यांनी केले. या विधानामुळे गुलाब बाबांच्या हजारो अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या असून वारकरी संप्रदाय आणि भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत सेवाश्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर आदमने आणि श्रीकांत शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांची भेट घेतली. यावेळी श्याम मानव यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. संतांचा वारंवार अपमान करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच पायबंद घालणे आवश्यक असून, संतांची निंदा कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असा इशारा यावेळी शिवणकर यांनी दिला. तसेच, प्रशासनाने त्वरित पावले न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
संतांवर बिनबुडाचे आरोप करून स्वतःचे महत्त्व वाढवणे हा श्याम मानव यांचा धंदा असल्याची टीका भाविकांनी केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आडून अनेकांबाबत खोटेनाटे दावे करणाऱ्या मानव यांच्यावर आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








