व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bacchu Kadu : धनुष्यबाण हाती घेतल्यावर बच्चू कडूंचे ‘टार्गेट’ कोण?

Bacchu Kadu : धनुष्यबाण हाती घेतल्यावर बच्चू कडूंचे ‘टार्गेट’ कोण?

Bacchu Kadu targets opponents through poster campaign : पोस्टरबाजीमुळे अचलपूरात राजकीय चर्चांना उधाण

Amravati माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिवसेना (शिंदे गट)चा धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर अचलपूर-परतवाडा जुळ्या शहरात पोस्टरबाजीचा जोर वाढला आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये भव्य पोस्टर्स झळकत असून, या पोस्टर्समधील संदेशांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
परतवाडा शहरातील अंजनगाव नाक्यावर लावण्यात आलेले पोस्टर विशेष लक्ष वेधून घेत आहे. ‘टायगर इज बॅक’ असा उल्लेख असलेल्या या पोस्टरमध्ये बच्चू कडू यांच्या हातात ताणलेला धनुष्यबाण दाखविण्यात आला आहे. हा बाण सोडण्याच्या तयारीत असल्याचे चित्रण करण्यात आले असून, तो नेमका कोणावर साधला जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

मागील काही दिवसांपासून बच्चू कडू विविध कारणांनी चर्चेत आहेत. शेतकऱ्यांना कर्ज मिळावे या मागणीसाठी त्यांनी मेळघाटात कडाक्याच्या उन्हात पदयात्रा केली होती. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर चांदूरबाजार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणामुळे ते पुन्हा चर्चेत आले. विद्यमान आमदार प्रवीण तायडे यांच्या भावाच्या जीवाला धोका निर्माण करण्याच्या कटाचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात अचलपूर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. संबंधित ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हे प्रकरण अधिक गाजले.

Bacchu Kadu : बच्चू कडू महायुतीत, पण भाजप स्वीकारणार का?

दरम्यान, राज्य सरकारच्या कर्जमाफी निर्णयाचे श्रेय बच्चू कडू यांच्या आंदोलनाला जात असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याने त्यांच्या राजकीय वजनात भर पडली आहे. भविष्यात त्यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशीही चर्चा रंगू लागली आहे.

Nasrapur crime : “फाशीही कमीच, जिवंत जाळा त्या नराधमाला”

या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, शहरभर लावण्यात आलेल्या पोस्टर्समधून विरोधकांना अप्रत्यक्ष आव्हान दिले जात असल्याची चर्चा आहे. ‘टायगर इज बॅक’ हा संदेश आगामी राजकीय संघर्षाची नांदी मानला जात आहे. त्यामुळे अचलपूर मतदारसंघातील राजकारण येत्या काळात अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, आमदार प्रवीण तायडे यांचा वाढदिवसही अलीकडेच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या भाषणातही आक्रमक सूर दिसून आला. दोन्ही नेते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत असल्याने, आगामी काळात या मतदारसंघात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!