व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Mamata Banerjee : ममतांचा राजीनाम्यास नकार; ‘निकाल षड्यंत्राचा’ आरोप

Mamata Banerjee : ममतांचा राजीनाम्यास नकार; ‘निकाल षड्यंत्राचा’ आरोप

mamata-refuses-resignation-west-bengal-election-conspiracy-allegation-political-crisis : मुख्यमंत्रीपदावर ठाम, बंगालच्या सत्तासंग्रामाला नवे वळण

Kolkata : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार देत राजकीय संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. निवडणूक निकाल हा जनतेच्या कौलाचा नसून निवडणूक आयोग आणि भाजप यांच्या संगनमतातून रचलेले षड्यंत्र असल्याचा गंभीर आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर राज्यात तापलेल्या राजकारणात ममतांच्या या भूमिकेमुळे संघर्ष रस्त्यावर उतरण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

भाजपने २०७ जागांवर विजय मिळवत सत्तास्थापनेची तयारी सुरू केली असून निवडणूक आयोगानेही निकालाची अधिकृत अधिसूचना राज्यपालांकडे पाठवली आहे. मात्र, हा पराभव मान्य करण्यास ममता तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘आम्ही भाजपविरोधातच नव्हे तर निवडणूक आयोगाविरोधातही लढलो. आयोगाने निष्पक्ष भूमिका न घेता भाजपला मदत केली. हा पराभव लोकांचा निर्णय नाही, त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.

LPG cylinder shortage : ७५० सिलिंडर हवेत गायब! पोंभुर्ण्यात गॅस एजन्सीचा महाघोटाळा; संतप्त जनतेचा प्रशासनावर एल्गार

मतमोजणी प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करत ममतांनी तृणमूलच्या शंभर जागा जाणीवपूर्वक हिरावून घेतल्याचा दावा केला. मतमोजणीची गती मुद्दाम कमी ठेवून कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणूक अधिकाऱ्यांवर थेट निशाणा साधत त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेला ‘लोकशाहीवरील आघात’ असे संबोधले.

दरम्यान, सत्तांतरानंतर लगेचच कोलकात्यातील न्यू मार्केट परिसरात तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर बुलडोझर कारवाई झाल्याने राजकीय वातावरण आणखी पेटले आहे. हे कार्यालय अनधिकृत असल्याचा दावा करत भाजप कार्यकर्त्यांनी कारवाई केली. या घटनेनंतर तृणमूल काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी सोशल मीडियावर टोला लगावत ‘बंगाली परिवर्तनाचा आनंद साजरा केला जात आहे’ अशी उपरोधिक प्रतिक्रिया दिली.

Ashish Jaiswal : संजय राऊत म्हणजे बुद्धी भ्रष्ट झाल्याचे जिवंत उदाहरण; आशिष जयस्वाल यांची टीका

या सर्व घडामोडींमुळे पश्चिम बंगालमध्ये केवळ सत्तांतर झालेले नाही, तर तीव्र राजकीय संघर्षाची नवी ठिणगी पडली आहे. ममता बॅनर्जी यांनी ‘इंडिया’ आघाडी अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करत राष्ट्रीय स्तरावरही भाजपविरोधी मोर्चेबांधणीला गती देण्याचे संकेत दिले आहेत. एकीकडे भाजप सत्तेची सूत्रे हाती घेण्याच्या तयारीत असताना, दुसरीकडे ममतांचा आक्रमक पवित्रा राज्यात दीर्घकाळ चालणाऱ्या राजकीय संघर्षाची चाहूल देत आहे.

error: Content is protected !!