Massive gas agency scam in Pombhurna; Angry public lashes out at administration : अतुल गॅस एजन्सीच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभारामुळे सामान्य ग्राहकांची फरफट
Pombhurna चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या गॅस तुटवड्याने आता एका मोठ्या घोटाळ्याचे रूप धारण केले असून नागरिकांचा संताप टोकाला पोहोचला आहे. घरगुती गॅस पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या अतुल गॅस एजन्सीच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभारामुळे सामान्य ग्राहकांची अक्षरशः फरफट होत आहे. एजन्सीचे संचालक जयपाल गेडाम यांनी कागदोपत्री ‘ऑनलाईन डिलिव्हरी’ दाखवून प्रत्यक्षात सिलिंडर न देता शासन आणि सर्वसामान्य जनतेची उघड फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पोंभुर्ण्यातील अनेक ग्राहकांच्या मोबाईलवर गॅस वितरित झाल्याचे संदेश आले असून त्यांच्या बँक खात्यात सबसिडी देखील जमा झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात एकाही ग्राहकाच्या घरापर्यंत सिलिंडर पोहोचलेला नाही. एजन्सीकडून ग्राहकांना फोन करून ओटीपी (OTP) मागितला जातो आणि त्यानंतर लगेच ‘डिलिव्हरी यशस्वी’ झाल्याची नोंद सिस्टीममध्ये केली जाते. ऑनलाईन आकडेवारीनुसार वितरित दाखवण्यात आलेले सुमारे ७५० सिलिंडर नेमके गेले कुठे? त्यांची काळ्या बाजारात विक्री झाली का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या ‘डिजिटल दरोड्या’मुळे शेकडो कुटुंबांची चूल अक्षरशः थंड पडली आहे.
Ashish Jaiswal : संजय राऊत म्हणजे बुद्धी भ्रष्ट झाल्याचे जिवंत उदाहरण; आशिष जयस्वाल यांची टीका
विशेष म्हणजे, आपल्या हक्काचा गॅस मागण्यासाठी एजन्सीवर जाणाऱ्या नागरिकांना, महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मालकाकडून अत्यंत उद्धट वागणूक दिली जात आहे. एजन्सीचे कार्यालय बहुतांश वेळ कुलूपबंद असते आणि विचारणा केल्यास “काय करायचे ते करा” अशा भाषेत मालकाकडून दमदाटी केली जाते. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाकडे सामूहिक निवेदने दिली, बैठका झाल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाच्या या ढिम्म भूमिकेमुळे पुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Chandrashekhar Bawankule : ममता बॅनर्जींचे ‘थर्ड डिग्री’ राजकारण जनतेने उध्वस्त केले
पोंभुर्णा तालुक्यातील महिला आणि सामान्य कुटुंबीय या जाचाला कंटाळले असून आता केवळ चौकशीने त्यांचे समाधान होणार नाही. अतुल गॅस एजन्सीवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, एजन्सीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा आणि ७५० सिलिंडरच्या गायब प्रकरणाचा हिशोब जाहीर करावा, अशी आक्रमक मागणी जनतेकडून होत आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास तालुक्यात मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.








