Nana Patole rubs salt into the wound over Praful Patel’s humiliation in the Nationalist Congress Party : सुनेत्रा पवार यांच्याकडून ही केवळ ‘प्रिंटिंग मिस्टेक’ असल्याचे सांगून वादावर पडदा
Nagpur राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) अंतर्गत घडामोडींनी राज्याच्या राजकारणात नवा गदारोळ निर्माण केला आहे. पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावांसमोर त्यांच्या पदांचा उल्लेख नसल्याचे समोर आले आहे.
या तांत्रिक चुकीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असतानाच, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रफुल पटेलांचा पक्षात अपमान होत असल्याची टीका करत या वादात उडी घेतली आहे. या निमित्ताने विदर्भातील पटेल आणि पटोले यांच्यातील जुने राजकीय वैर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
राष्ट्रवादीच्या नव्या यादीत नावे असूनही पदे नसल्याने पटेल आणि तटकरे यांना पदावरून हटवण्यात आले की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी ही केवळ ‘प्रिंटिंग मिस्टेक’ असल्याचे सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला, तरी वारंवार होणाऱ्या या चुकांमुळे पक्षात नक्कीच काहीतरी शिजत असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी अशाच प्रकारचा गोंधळ झाला असता पार्थ पवार यांनी बाजू सावरून धरली होती; मात्र आता अजित पवारांच्या अनुपस्थितीत पक्षात नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला असून प्रफुल पटेल यांनी पक्ष ‘हायजॅक’ केल्याचे आरोपही काही गटांकडून केले जात आहेत.
Devendra fadnavis : फडणवीसांच्या परवानगीशिवाय मंत्र्यांना विमान प्रवासाला बंदी !
भंडारा-गोंदिया जिल्ह्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी पटेल आणि पटोले यांच्यात नेहमीच संघर्ष पाहायला मिळतो. लोकसभेपासून ते जिल्हा बँक आणि दूध संघापर्यंत या दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरुद्ध कुरघोडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. याच वैराची धार कायम ठेवत नाना पटोले यांनी पटेलांच्या सद्यस्थितीवर खोचक भाष्य केले.
“प्रफुल पटेल हे पक्षाच्या स्थापनेपासून सोबत आहेत, अजित पवारांच्या फुटीनंतरही त्यांनी दिल्लीत पक्षाची ढाल म्हणून काम केले, मात्र आता त्यांनाच बाजूला सारले जात असेल तर हा त्यांचा मोठा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे. राष्ट्रवादीतील या अंतर्गत कलहामुळे विदर्भाच्या राजकारणात आगामी काळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








