rohit-pawar-claims-sunil-tatkare-praful-patel-to-contest-from-bjp : रोहित पवारांचा दावा, सुनील तटकरेंचे एका वाक्यात प्रत्युत्तर
Pune : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठ्या उलथापालथीच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी मंगळवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना मोठा वेग आला. या भेटीनंतर आता आमदार रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा राजकीय भूकंप होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना खळबळजनक दावा करत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे तब्बल २२ आमदारांसह भाजपमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील काही आमदारांनाही भाजप आपल्या गळाला लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. मावळचे आमदार सुनिल शेळके हे देखील भाजपमधून निवडणूक लढवतील, असा दावा करत रोहित पवार यांनी राज्यातील आगामी राजकीय समीकरणांबाबत मोठे संकेत दिले आहेत.
रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू असतानाच सुनील तटकरेंनी अत्यंत थोडक्यात प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी “रोहित पवारांच्या मताला मी किंमत देत नाही,” असे एका वाक्यात उत्तर दिले. तटकरेंच्या या प्रतिक्रियेनंतरही राजकीय चर्चांचा बाजार मात्र आणखी तापला आहे.
दरम्यान, रोहित पवार यांच्या दाव्यावर मावळचे आमदार सुनिल शेळके यांनीही जोरदार पलटवार केला आहे. रोहित पवार गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने खोटी वक्तव्ये करत असून प्रसिद्धी मिळवण्यासाठी पक्षात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप शेळकेंनी केला. बारामतीतील पोटनिवडणुकीवेळी काँग्रेसचा उमेदवार असावा असा आग्रह रोहित पवार यांनी धरला होता, असा दावा करत २०२९ मध्ये ते काँग्रेसकडून बारामतीत निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचेही शेळकेंनी म्हटले. मात्र, अशा वक्तव्यांमुळे पक्षात कोणतीही चलबिचल निर्माण होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Neet paper leak : नीट पेपरफुटीने देश हादरला; नाशिकच्या शुभमपासून पुण्याच्या धनंजयपर्यंत…
याचदरम्यान, शरद पवार यांच्या भेटीनंतर सुनील तटकरे यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट करत या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, शरद पवार यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी ठीक नसल्याने ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते. त्यानंतर त्यांची भेट घेण्याची इच्छा होती, मात्र वेळ जुळून न आल्याने ही भेट उशिरा झाली. या भेटीत कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.
सुनील तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये शरद पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दीर्घकाळ काम केल्याचे म्हटले. आपल्या राजकीय जडणघडणीत शरद पवार यांचा मोठा वाटा असल्याचे सांगत त्यांची भेट घेणे ही महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय परंपरेचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून त्यांची कार्यक्षमता आजही पूर्वीसारखीच असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
Gold silver import : सोने-चांदीवरील कस्टम ड्यूटी पुन्हा १५ टक्क्यांवर
दरम्यान, रोहित पवार यांनी या भेटीवर भाष्य करत “कदाचित सुनील तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असेल,” असा टोला लगावला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








