attempt to end Dr. Sanjay Kute’s displeasure by assigning him a ‘new responsibility’ : मंत्रिपद हुकलं, पण पक्षात वाढलं वजन, संघटनेच्या माध्यमातून ‘कमबॅक’
Buldhana राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने काही काळ राजकीय चर्चांपासून दूर गेलेले डॉ. संजय कुटे आता भाजपच्या नव्या संघटनात्मक जबाबदारीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. भाजपने त्यांच्याकडे विदर्भ विभाग समन्वयकपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांचे पक्षांतर्गत राजकीय वजन पुन्हा वाढल्याची चर्चा आहे. मात्र, या नवीन जबाबदारीमुळे त्यांच्या नाराजीवर पडदा पडला की नाही, हे वेळच सांगणार आहे.
राजकारणात काही नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते, तर काही नेते संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःचा प्रभाव टिकवून ठेवतात. डॉ. कुटे यांच्या बाबतीत सध्या हाच दुसरा पर्याय अधिक प्रभावी ठरत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. मधल्या काळात “आमदार आहेत; मात्र फारसे सक्रिय दिसत नाहीत,” अशी चर्चा त्यांच्या संदर्भात होत होती. मात्र भाजपने त्यांच्यावर विदर्भातील तब्बल ११ जिल्ह्यांच्या समन्वयाची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नव्याने उत्साह निर्माण झाला आहे.
Devendra fadnavis : “पंतप्रधानांच्या आवाहनाची थट्टा सहन केली जाणार नाही”
भाजपच्या संघटनात्मक रचनेत विदर्भ विभाग समन्वयकपद हे महत्त्वाचे मानले जाते. जिल्हाध्यक्ष, तालुका पदाधिकारी, बूथस्तरीय संघटना आणि विविध पक्षीय उपक्रमांचा समन्वय या पदामार्फत साधला जातो. त्यामुळे पक्ष संघटनेतील अनेक सूत्रे आता डॉ. कुटे यांच्या समन्वयातून हलणार असल्याची चर्चा आहे.
मंत्रीपद न मिळाल्याची नाराजी न दाखवता संघटनात्मक ताकदीच्या माध्यमातून पक्षातील प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न डॉ. कुटे यांनी यशस्वीपणे सुरू केला आहे. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पक्ष संघटन विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी त्यांच्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, विदर्भ समन्वयकपदाच्या निमित्ताने डॉ. कुटे यांचे भाजपमधील स्थान पुन्हा मजबूत होत असल्याचे चित्र दिसत असून, भविष्यात पक्षाच्या मोठ्या निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका अधिक प्रभावी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








