पदाधिकारी कार्यकर्त्यांना आंदोलनापासून दूर राहण्याच्या सूचना ?
Nagpur: आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महायुती सरकारला घेरण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी शेगाव ते नागपूर असा ‘न्याय हक्क ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे. मात्र, या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातच मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मोर्चात सहभागी होऊ नये, असे आवाहन केले जात असल्याची चर्चा असून, त्यामुळे रोहित पवार यांच्या आंदोलनाला पक्षातून कितपत पाठिंबा मिळणार, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ४ डिसेंबरपासून शेगाव येथून ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात होणार असल्याचे जाहीर केले. हा मोर्चा ९ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधानभवनावर धडकणार आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि प्रलंबित सरकारी मदत या मुद्द्यांवरून सरकारचे लक्ष वेधणे हा या आंदोलनाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. अपुऱ्या पावसामुळे अनेक भागांतील उभी पिके करपली असून, शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सरकारने मदतीच्या घोषणा केल्या; मात्र प्रत्यक्ष मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये देण्याची हमीही पूर्ण झाली नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.
केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केल्याचे राज्य सरकार सांगत असले, तरी केंद्राकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊनही ठोस कार्यवाही झाली नसल्याने ट्रॅक्टर मोर्चाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मात्र, या मोर्चाच्या घोषणेनंतर पक्षातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आंदोलनापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत समन्वयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातावरूनही रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी संबंधित विमान कंपनीच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कंपनीच्या संचालकांसोबतचा फोटोही त्यांनी सार्वजनिक केला होता. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांची पत्रकार परिषद पक्षाच्या वतीने नव्हती आणि त्यांचे आरोप व मते वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या प्रकरणात पक्षाची अधिकृत भूमिका आणि रोहित पवार यांची भूमिका वेगळी असल्याचे समोर आले होते.
विधानभवनापूर्वी बारामती ॲग्रोवर मोर्चा काढा; भाजप आमदार परिणय फुके यांचे रोहित पवारांना आव्हान !
याशिवाय, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांबाबत तसेच मतदारसंघ फेररचना विधेयकाबाबतही रोहित पवार यांनी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांपेक्षा वेगळी भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्या स्वतंत्र राजकीय भूमिकेमुळे पक्षात दोन प्रवाह निर्माण झाले आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचाही मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असून, अपघातासंदर्भातील तांत्रिक प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. संबंधित कंपनीची प्रतिमा चांगली असल्याचे सांगण्यापेक्षा अपघाताबाबत निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करणे आणि दोषींवर गुन्हे दाखल करणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला खासदार अमर काळे, जिल्हाध्यक्ष सलील देशमुख, माजी आमदार चरण वाघमारे आणि शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आता ४ ते ९ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या मोर्चाला पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा प्रत्यक्ष किती प्रतिसाद मिळतो, तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष सहभागी होतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
___








