महसूलमंत्री बावनकुळेंची राजू शेट्टींशी चर्चा, म्हणाले ‘भूमिकेचा विपर्यास’
Nagpur : शेतीच्या नावाखाली जमीन सलग तीन वर्षे पडीक ठेवल्यास तिच्या व्यवस्थापनाबाबत शासन कारवाई करू शकते, या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावरून राज्यात राजकीय आणि शेतकरी वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सरकार या तरतुदीच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या बड्या उद्योगपतींच्या घशात घालणार असल्याचा आरोप विरोधकांसह काही शेतकरी संघटनांनी केला. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
बावनकुळे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, १९४८ च्या कुळ कायद्यातील कलम ६५ मध्ये जमीन सलग तीन वर्षे पडीक ठेवल्यास तिच्या व्यवस्थापनाबाबत शासनाला अधिकार असल्याची तरतूद आधीपासूनच आहे. मात्र, या तरतुदीचा अर्थ सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार ताब्यात घेणार असा होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा किंवा विदर्भातील मूळ शेतकऱ्यांच्या जमिनींवर या भूमिकेचा परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. महसूल विभागाची भूमिका स्वतः शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे संरक्षण करण्याची असल्याचा दावा त्यांनी केला.
विधानभवनापूर्वी बारामती ॲग्रोवर मोर्चा काढा; भाजप आमदार परिणय फुके यांचे रोहित पवारांना आव्हान !
मंत्री बावनकुळे यांच्या म्हणण्यानुसार, काही बड्या व्यक्तींनी शेतकऱ्यांकडून शेकडो एकर जमीन खरेदी केली आहे. त्यापैकी काही जमिनींवर फार्महाऊस उभारण्यात आले आहेत, तर काही जमिनी भविष्यातील व्यवहार किंवा ‘लँड बँक’ तयार करण्याच्या उद्देशाने विनावापर पडीक ठेवल्या जात आहेत. अशा जमिनींवर प्रत्यक्ष शेती होत नसल्याने कृषी उत्पादनावर परिणाम होतो, असे त्यांचे म्हणणे आहे. या जमिनींवर चारा आणि विविध पिकांचे उत्पादन घेतले गेले, तर राज्याचे तसेच देशाचे कृषी उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न आणि जीडीपी वाढण्यास हातभार लागू शकतो. त्यामुळे सरकारची सूचना प्रामुख्याने अशा प्रकारच्या जमिनींच्या संदर्भात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे शिवसेनेत ‘भाकरी फिरवणार’; नगरसेवकांच्या कामाचे ऑडिट
दरम्यान, या मुद्द्यावर शेतकरी संघटनांकडून व्यक्त होत असलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती दिली. या संभाषणात शासनाची नेमकी भूमिका आणि तरतुदीचा उद्देश शेट्टी यांना समजावून सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. सामान्य शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींबाबत कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याचेही त्यांना स्पष्ट केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
एकीकडे सरकारकडून या तरतुदीचा उद्देश पडीक जमीन शेतीच्या उपयोगात आणण्याचा असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे शेतकरी संघटनांकडून जमिनींच्या मालकीहक्काबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या तरतुदीची अंमलबजावणी नेमकी कोणत्या निकषांवर होणार, याकडे आता शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
___








