Farmer trapped in a ‘honey trap’ and extorted of ₹70 lakh; case registered against couple from Amravati : चार वर्षांत टप्प्याटप्प्याने दिले पैसे; जमीन विक्रीतून मिळाले होते अडिच कोटी
Amravati शेतजमीन विक्रीतून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांवर डोळा ठेवून ६४ वर्षीय शेतकऱ्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून तब्बल ७० लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी एका दांपत्याविरुद्ध खंडणीसह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित शेतकरी हा नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून त्याचे शहरात स्वतःचे घर आहे. गाडगेनगर परिसरात आरोपी दांपत्याचे मोबाइल दुकान आहे. मोबाइल रिचार्ज करण्यासाठी शेतकरी नियमितपणे या दुकानात जात होता. याचदरम्यान त्याची आरोपी दांपत्याशी ओळख झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढे महिलेने शेतकऱ्याशी जवळीक वाढवून त्याच्याशी संमतीने संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर महिलेने आणि तिच्या पतीने संगनमत करून शेतकऱ्याला अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. बदनामी आणि पोलिस कारवाईच्या भीतीमुळे शेतकरी प्रचंड मानसिक दबावाखाली होता.
या दबावातून गेल्या चार वर्षांत संबंधित शेतकऱ्याने टप्प्याटप्प्याने तब्बल ७० लाख रुपये आरोपी दांपत्याला दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अखेर त्रास असह्य झाल्यानंतर शेतकऱ्याने ११ मे रोजी रात्री उशिरा नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Shindi Gram Panchayat : शिंदी ग्रामपंचायतीत २०२४-२५ चे कॅशबुक गायब; ऑडिट पथक रिकाम्या हाताने परतले
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या पतीविरुद्ध खंडणीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, संबंधित शेतकऱ्याने २०२० मध्ये शेतजमीन विक्री केली होती. या व्यवहारातून त्याला सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये मिळाले होते. शेतकऱ्याकडे मोठी रक्कम असल्याची माहिती आरोपी दांपत्याला मिळाल्यानंतर त्यांनी सुनियोजित पद्धतीने ‘हनी ट्रॅप’चे जाळे विणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.








