व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Yugendra pawar : अजितदादांचं नाव घेत युगेंद्र पवारांनी सोडला राजकीय बाण

Yugendra pawar : अजितदादांचं नाव घेत युगेंद्र पवारांनी सोडला राजकीय बाण

yugendra-pawar-big-statement-on-ncp-merger-ajit-pawar-sharad-pawar-baramati : ‘100 टक्के माझी काळजी घेतली असती” म्हणत विलीनीकरणावर स्पष्ट भूमिका

 

Baramati : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना जोर आला होता. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळताना दिसत असून दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून विलीनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले जात आहेत. अशातच शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी बारामती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत विलीनीकरणाच्या मुद्द्यावर मोठं विधान करत अनेक राजकीय प्रश्नांवर भाष्य केलं.

युगेंद्र पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “विलीनीकरण आता होणार नाही.” या मुद्द्यावर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असल्याचे सांगत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची गरज असल्याचे म्हटले. “प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीदेखील स्पष्ट केलं आहे की विलीनीकरण होणार नाही. त्यांचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावा यासाठी मी बोलत आहे,” असे ते म्हणाले.

Chandrashekhar bawankule : कोणाचे नगरसेवक गायब?, बावनकुळे म्हणाले काँग्रेसने त्यांच्या माणसांचा शोध घ्यावा

तथापि, राजकारणात कधीही काहीही घडू शकते, असे सांगत त्यांनी भविष्यातील शक्यता पूर्णपणे नाकारल्या नाहीत. “चर्चा होत्या, हे खरं आहे. पण राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही,” असेही त्यांनी नमूद केले.

विलीनीकरण झाल्यास त्याचा स्वतःच्या राजकीय भवितव्यावर परिणाम झाला असता का, असा प्रश्न विचारला असता युगेंद्र पवार यांनी अजित पवारांचा उल्लेख करत महत्त्वाचे विधान केले. “विलीनीकरण झालं असतं तर पवार साहेब आणि अजितदादा यांनी 100 टक्के माझी काळजी घेतली असती, याचा मला पूर्ण विश्वास आहे,” असे ते म्हणाले.

2029 मध्ये बारामतीत पुन्हा “पवार विरुद्ध पवार” अशी लढत होणार का, या प्रश्नावर त्यांनी सावध भूमिका घेतली. “पवार विरुद्ध पवारच लढाई होईल याची काय खात्री आहे? उद्या काहीही होऊ शकतं. 2029 साठी अजून तीन वर्षे बाकी आहेत. एका वर्षात खूप काही बदलू शकतं. तुम्ही मला 2028 मध्ये विचारा, मग मी सांगतो,” असे उत्तर त्यांनी दिले.

Supriya sule : जावई-व्याहींसह आधी मोदींची भेट, नंतर इंधन दरवाढीवरून केंद्रावर हल्लाबोल !

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात एखादं मोठं पद मिळण्याची अपेक्षा होती का, या प्रश्नावरही युगेंद्र पवार यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. “इथे ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले त्यांनाही मोठी मोठी पदं मिळाली आहेत. कदाचित माझी अपेक्षा चुकीची असू शकते,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला.

मात्र पद न मिळाल्याचा कोणताही खेद नसल्याचे सांगताना त्यांनी बारामतीतील जनतेसोबत अधिक वेळ घालवता आल्याचे नमूद केले. “मला लोकांसाठी जास्त वेळ देता आला. लोकांमध्ये जाऊ शकलो. काही लोक पद घेतात पण त्या पदाला न्याय देत नाहीत. मला तसं करायचं नव्हतं,” असे ते म्हणाले.

युगेंद्र पवार यांच्या या विधानांमुळे बारामतीसह राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

_

error: Content is protected !!