Congress state president harshwardhan sapkal focusing on home district Buldhana : आंदोलनांच्या मालिकेसह स्थानिक प्रश्नांवरही लक्ष; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
Buldhana काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यभर विविध प्रश्नांवर आंदोलनांची मालिका सुरू केली असली, तरी सध्या त्यांचा विशेष फोकस गृहजिल्हा बुलढाण्यावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राज्यातील शेतकरी, बेरोजगारी, महागाई आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत असताना, बुलढाण्यातील त्यांच्या वाढत्या उपस्थितीने राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
गेल्या काही महिन्यांत विविध आंदोलनांमध्ये सहभाग, स्थानिक बैठका तसेच मानेगाव-जळगाव पदयात्रेत सक्रिय उपस्थिती यामुळे सपकाळ यांचे जिल्ह्यातील राजकीय वजन वाढत असल्याचे मानले जात आहे. आता १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या ‘आसूड मोर्चा’तही त्यांच्या सहभागाची घोषणा झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Vikram kakade : अर्ज भरताना हाय ‘व्होल्टेज ड्रामा’, फोनाफोनी आणि राजकीय चर्चांना उधाण
प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेक नेत्यांचा भर राज्यभर संघटन विस्तार, पक्षबांधणी आणि राजकीय समीकरणांवर असतो. मात्र, सपकाळ यांनी राज्यव्यापी आंदोलनांसोबतच गृहजिल्ह्यातील प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे चित्र सध्या दिसून येत असल्याची चर्चा आहे. यामागे स्थानिक संघटन बळकट करणे, कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणे आणि आगामी राजकीय समीकरणांची तयारी अशा विविध शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील पाणी, शेती, रोजगार आणि प्रशासनाशी संबंधित प्रश्नांवर काँग्रेसची भूमिका अधिक आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सपकाळ यांच्या वाढत्या सक्रियतेमुळे स्थानिक प्रश्न सुटण्याच्या प्रक्रियेला गती मिळते की जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








