व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Water shortage : जिल्ह्यातील १५८ गावांत पाणीटंचाईचे संकट; ३८ गावांना टँकरचा आधार

Water shortage : जिल्ह्यातील १५८ गावांत पाणीटंचाईचे संकट; ३८ गावांना टँकरचा आधार

Water scarcity crisis grips 158 villages in Buldhana district; 38 villages dependent on water tankers : मेहकर-देऊळगाव राजात पाण्याची तीव्र टंचाई; महिलांची कोसोदूर पायपीट

Buldhana जून महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील १५८ गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून मेहकर आणि देऊळगाव राजा तालुक्यांत परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. परिणामी, अनेक गावांतील महिलांना पाण्यासाठी कोसोदूर पायपीट करावी लागत आहे.

जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरालाही पाणीटंचाईचा फटका बसला असून ग्रामीण भागातील साखळी बुद्रुकसह अनेक गावांमध्ये पाण्यासाठी आंदोलने करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील १२१ गावांमध्ये टंचाईची तीव्रता वाढल्याने प्रशासनाने १३८ खाजगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यामध्ये मेहकर तालुक्यात सर्वाधिक ५१ गावांसाठी ५२ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. देऊळगाव राजा तालुक्यातील २७ गावांसाठी ४३ विहिरी, तर शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील प्रत्येकी सात गावांसाठी सात विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. खामगाव व जळगाव जामोद तालुक्यांमध्ये अनुक्रमे पाच आणि चार विहिरींवरून पाणीपुरवठा केला जात आहे.

Farmers loan waiver : कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक; काँग्रेसकडून शासन निर्णयाची होळी

सध्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ३८ गावांना ४० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाऊस वेळेवर न झाल्यास पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बुलढाणा तालुक्यातील पिंपरखेड, चौथा, हनवतखेड, गिरडा, पिंपळगाव सराई आणि मढ, सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ, निमखेड नागझरी, किनगाव राजा, शेंदुर्जन व दरेगाव, तसेच चिखली तालुक्यातील भालेगाव, कोलारा आणि धानोरी या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

मेहकर तालुक्यातील ढासाळवाडी, वडाळी, वरवंड, लोणी गवळी, हिवरा साबळे, निंबा, बोथा, पारडी, बेलगाव, जवळा, मिसाळवाडी, पाथर्डी, लोणीकाळ व घुटी या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील सावखेड नागरे, निमखेड, धोत्रानंदई, कुंभारी, मंडपगाव, पिंपळगाव चिलमखोड, अंढेरा, सुरा आणि गोळेगाव या गावांची तहानही टँकरद्वारे भागविण्यात येत आहे.

Ncp anniversary : अजित पवारांच्या निधनानंतरचा पहिलाच वर्धापन दिन पुढे ढकलला

बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणावर १३ गावांच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असल्यामुळे, गतवर्षी मुबलक पाणीसाठा असूनही यंदा पावसाळ्याच्या तोंडावर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरातील अनेक भागांत सध्या सात ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.

या समस्येवर उपाय म्हणून बुलढाणा नगरपालिकेने सुमारे ६० किलोमीटर अंतरावरील खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी आणण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील पाणीपुरवठा परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन नगरपालिका प्रशासनाने केले आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात जिल्ह्यात ३० टँकर कार्यरत होते. आता ही संख्या वाढून ४० वर पोहोचली असून पाणीटंचाईची तीव्रता स्पष्ट होत आहे.

error: Content is protected !!